महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) संगमनेर शहरातील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका अवैध कत्तलखान्यावर मोठी छापेमारी केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १४०० किलो गोमांस आणि कत्तलीचे साहित्य असा एकूण ४ लाख २२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड आणि अंमलदार अतुल लोटके, गणेश लबडे, प्रकाश मांडगे, अमोल आजबे, संभाजी कोतकर यांचे पथक संगमनेर शहर हद्दीत गस्त घालत होते. यावेळी जमजम कॉलनीतील गल्ली क्रमांक १० मध्ये फैजान अक्तार शेख याच्या घरालगत असलेल्या निळ्या रंगाच्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने पंचासमक्ष सदर ठिकाणी छापा टाकला असता, शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल केल्याचे निदर्शनास आले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच कत्तल करणारे इसम घटनास्थळावरून पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ४ लाख २० हजार रुपये किमतीचे १४०० किलो गोमांस, ७०० रुपये किमतीचे तीन चाकू व दोन लोखंडी कुऱ्हाडी आणि २ हजार रुपये किमतीचा एक इलेक्ट्रॉनिक काटा असा एकूण ४ लाख २२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २७१, ३२५ सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) चे कलम ५ (ब), (क) आणि ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत.