महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अकोले बायपास परिसराजवळ कॉलेजला जाण्यासाठी उभ्या असलेल्या महिला शिक्षिकेच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची सोन्याची मिनी गंठण दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ओरबाडून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील जनतगर पश्चिम गल्ली क्रमांक ०३ येथील रहिवासी असलेल्या प्रिया सुनील कुडेकर (वय ४१, धंदा: नोकरी) या महिला शिक्षिका असून त्या आपली सहकारी शिक्षिका सुनंदा देशमुख यांच्यासह कॉलेजवर जाण्यासाठी शनिवारी (१४ नोव्हेंबर) सकाळी ९ वाजून १० मिनिटांच्या सुमारास रघुनंदन मॉल, अकोले बायपास, संगमनेर येथे थांबल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून पल्सर मोटारसायकलवरून दोन अज्ञात इसम आले. त्यापैकी मागे बसलेल्या तोंडाला रुमाल बांधलेल्या इसमाने फिर्यादी प्रिया कुडेकर यांच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची दीड तोळा वजनाची सोन्याची मिनी गंठण जोरात ओढून तोडून घेतली व आरोपी घटनास्थळावरून वेगाने पसार झाले.
या प्रकरणी फिर्यादी प्रिया कुडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(१) प्रमाणे स्नॅचिंगचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे करत आहेत.