महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शेतातील मशागतीदरम्यान जेसीबीच्या सहाय्याने मोटारीची केबल तुटल्याच्या किरकोळ कारणावरून वाद होऊन ६५ वर्षीय ज्येष्ठ शेतकऱ्याला शिवीगाळ करत दगडाने व कुऱ्हाडीच्या लाकडी दांडक्याने जबरी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर गावच्या घोडेवहाळ शिवारात शनिवारी (७ नोव्हेंबर) सकाळी ११.४५ ते दुपारी १२.०० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पीडित शेतकऱ्याच्या तक्रारीवरून अकोले पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर येथील ६५ वर्षीय शेतकरी बाळासाहेब मारुती फापाळे हे आपल्या शेतात काम करत असताना शेजारील शेतकरी गणेश भाऊराव गोपाळे यांच्या मोटारीची केबल जेसीबीच्या कामादरम्यान अडकून तुटली. यावरून गणेश गोपाळे याने बाळासाहेब फापाळे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. संतापाच्या भरात आरोपीने अंगावर धावून जात त्यांना खाली पाडले आणि डोक्यात दगडाने मारहाण करून दुखापत केली. त्यानंतर कुऱ्हाडीच्या लाकडी दांडक्याने पाठीवर मारहाण करून गंभीर जखमी केले.
घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी करत जखमी शेतकऱ्याची सुटका केली. त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. औषधोपचार घेतल्यानंतर बाळासाहेब फापाळे यांनी अकोले पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी गणेश भाऊराव गोपाळे (रा. बेलापूर, ता. अकोले) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल बापू देशमुख करत आहेत.