महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) संगमनेर शहरातील जमजम कॉलनी आणि मदिनानगर परिसरात छापा टाकून एका बेकायदेशीर कत्तलखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ८०० किलो गोमांसासह ५ गोवंशीय जनावरांची सुटका केली असून एकूण ३ लाख ८० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे आणि पोलीस अंमलदार गणेश लोंढे, अतुल लोटके, रिचर्ड गायकवाड, भिमराज खर्से, रणजीत जाधव, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे व जालींदर साखरे यांच्या पथकाने संगमनेर शहर परिसरात गोपनीय माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.
तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, मोगलपुरा येथील समीर हसन कुरेशी हा गोवंशीय जनावरांची खरेदी करून जमजम कॉलनीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये कत्तल करत आहे, तर काही जनावरे मदिनानगर येथील काटवनामध्ये डांबून ठेवली आहेत. माहितीची खात्री पटल्यानंतर पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी तात्काळ छापा टाकला.
छाप्यादरम्यान प्रत्यक्ष कत्तल करताना आरोपी पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी समीर हसन कुरेशी (वय ५५, रा. मोगलपुरा), सोनू उर्फ फैजान शाहीद कुरेशी (वय २०), महमंद अहमद अब्दुलवाहब कुरेशी (वय ३५), शाहीद गणी कुरेशी (वय ४२, सर्व रा. जमजम कॉलनी, संगमनेर) आणि मुजम्मील अब्दुलहमीद इनामदार (वय ३३, रा. जुन्नर, जि. पुणे) यांना ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी २ लाख ४० हजार रुपये किमतीचे ८०० किलो गोमांस, १ लाख ४० हजार रुपये किमतीची ५ जिवंत गोवंशीय जनावरे आणि कत्तलीसाठी वापरलेले चाकू व सत्तुर असा एकूण ३ लाख ८० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींना मुद्देमालासह संगमनेर शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १०६९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २७१, ३२५, ३(५) आणि महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम (सुधारित २०१५) चे कलम ५(अ)(ब)(क), ९, ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत.