बीड – बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटून देखील पोलीस तपासा संदर्भात माहिती देत नसल्याचा गंभीर आरोप करत देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सोमवारी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत न्यायासाठी आक्रोश केला. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यावर बांगड्या फेकल्या.
आंदोलनावेळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच या आंदोलनात गावातील महिला सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. आंदोलनातील महिलांनी मुख्य आरोपी अजूनही मोकाट कसा? त्याला खुनाच्या कलमाखाली अटक का करण्यात आली नाही? असा संताप व्यक्त केला. संताप व्यक्त करत महिलांनी एसपी गावात यांच्यावर बांगड्या फेकत देशमुख हत्याकांड प्रकरणांमध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला.
दरम्यान धनंजय देशमुख यांनी गनिमी काव्याने गावातील पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केले. बीड पोलीस प्रशासन आणि मराठा आंदोलन करते मनोज जरांगे पाटील हे सुद्धा यावेळी आंदोलन स्थळी उपस्थित होते. देशमुख यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत पाण्याच्या टाकीवरून खाली उतरण्याचा त्यांना सल्ला दिला मात्र देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर गेल्यानंतर एक शिडी काढून ठेवल्याने पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलिसांकडून अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले होते. तब्बल दोन तासांच्या मनधरणीनंतर मनोज जरांगे यांच्या विनंतीनंतर धनंजय देशमुख यांना पाण्याच्या टाक्यावरून खाली उतरविण्यात यश आले. खाली आल्यानंतर देशमुख यांनी एसपीसोबत बोलण्यास नकार दिला.