संगमनेर –
महिलेच्या गळ्यातील दागिने लांबवत ते शहरातील सोनाराला विकण्यात आले. चोरीचे दागिने घेणाऱ्या त्या महिला सोनाराला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
जामीन अर्ज फेटाळताना अर्जदार आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दागिने स्वीकारले असले तरी अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात मुद्देमाल हस्तगत करण्यासाठीच नव्हे तर अशाच प्रकारचे इतर गुन्हे उघडकीस येण्यासाठी व गुन्हा करणाऱ्या आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी अर्जदार आरोपीचा पोलिसांकडून तपास होणे आवश्यक असल्याचा व अर्जदाराला अटकपूर्व जामीन दिला तर तपसी यंत्रणेला कायद्याने प्राप्त झालेले अधिकार हिरावून घेतले जाण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करत हा महत्त्वाचा निष्कर्ष न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी नोंदविला आहे.
झेंडावंदनाचा कार्यक्रम संपवून दुचाकीवरून घरी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी धूम स्टाईल लांबविण्याची घटना नाशिक पुणे मार्गावरील अमृता लॉन्स जवळ घडली विना क्रमांकाच्या मोटार सायकल वरून आलेल्या दोघांनी या महिलेच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे गंठण हिसकावत नाशिकच्या दिशेने पलायन केले होते. महिलेच्या गळ्यातील दागिने लांबविणाऱ्या बलराम यादव आणि दीप भटू सातपुते या दोघांना पोलिसांनी पकडले होते.
दोन्ही आरोपींना पकडल्यानंतर त्यांनी चोरी केलेले दागिने शहरातील एका सोनाराला विकल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांना तपासात हे दागिने रितेश संतोष नागरे व शिल्पा संतोष नागरे (अर्जदार) या महिला सोनारासह तिच्या मुलाने घेतल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी या सोनारांना देखील या गुन्ह्यात आरोपी केले होते.
आरोपीकडून दागिने घेताना संबंधित सोनारांना हा चोरीचा मुद्देमाल आहे हे माहीत असताना देखील त्यांनी ते दागिने विकत घेतले. त्यामुळे अर्जदार आरोपींकडून पुण्यातील मुद्देमाल जप्त करण्यासाठी पोलिसांना त्यांचा ताबा मिळण्यासाठी अटकपूर्व जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.
तसेच आरोपींनी केवळ याच गुन्ह्यात नव्हे तर अनेक गुन्ह्यात रॉबरीद्वारे हस्तगत केलेला सोन्याचा माल आरोपींनी अर्जदाराकडे विकला असल्याचे व आपण विकत घेत असलेले दागिने चोरी अथवा रॉबरीचे असल्याचे अर्जदाराला माहीत असल्याचे सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी न्यायालयासमोर आणले होते.
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने महिला सोनाराचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने आता पोलीस या महिला सोनाराला अटक करून कधी चौकशी करतात याकडे लक्ष लागले आहे.
चोरीचे दागिने घेणाऱ्या त्या सोनार महिलेचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने फेटाळला!
जामीन नाकारताना अर्जदार आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दागिने स्वीकारले असले तरी अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात मुद्देमाल हस्तगत करण्यासाठीच नव्हे तर अशाच प्रकारचे इतर गुन्हे उघडकीस येण्यासाठी व गुन्हा करणाऱ्या आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी अर्जदार आरोपीचा पोलिसांकडून तपास होणे आवश्यक असल्याचा काढला निष्कर्ष