संगमनेर दि. २ फेब्रुवारी –
शनिवारी सायंकाळी वॉकिंग करून घराकडे परतणाऱ्या महिला शिक्षिकेच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघा चोरट्यांनी हिसकावून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. दागिने चोरांचा तपास लावण्यात संगमनेर पोलीस अपयशी ठरल्याने चोरांची मजल वाढली असून आता चोरटे दिवसाढवळ्या गुन्हे करू लागले आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात शनिवारी रात्री संबंधित महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस स्थानकासह शहराच्या विविध भागात दागिने चोर, घरफोड्या करणाऱ्यांनी, दुचाकी चोरांनी उच्छाद मांडला आहे. या चोरट्यांना पकडण्यात संगमनेर पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत. चोरीच्या गुन्ह्यांचा तपास लागत नसल्याने गुन्हेगार मोकाट सुटत असून पोलीस नेमके काय करतात असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान गुंजाळ मळा, श्रद्धा कॉलनी येथील शिक्षिका योगिता टकले या साई कॉर्नर किराणा दुकानासमोर बायपास रोडला असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या व काळे जर्किन घातलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्याकडील सोन्याचे मिनी गंठण हिसकावून तोडून नेले. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ८६/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहेत.