२० लाखाचे दागिने असलेली पिशवीच चोरट्यांनी पळविली, एकाने पत्ता विचारण्याचा केला बहाना तर दुसऱ्याने पिशवी पळविली
मोती चौका जवळील पुष्पम गोल्ड या दुकानासमोर फुटपाथवरून जाताना त्यांच्याजवळ आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांना पत्ता विचारण्याचा बहाना केला. त्याच दरम्यान दुसऱ्या व्यक्तीने त्यांना पाठीमागून धक्का देत त्यांच्या हातातील तांबड्या रंगाची कापडी पिशवी हिसकावली.


शनिवार, दि. ०८ फेब्रुवारी –
अधिक माहिती अशी, चिरंजीत अंबिका बाग हे अभिजीत दास यांच्या ‘अभिजीत गोल्ड’ या सोन्याच्या कारखान्यात कामाला आहे. कारखान्यात घडवलेले १९ लाख ९४ हजार १०० रुपये किमतीचे २५५ ग्रॅम वजनाचे दागिने एका तांबड्या रंगाच्या पिशवीत घेऊन ते गुरुवारी पुण्याच्या मोती चौकातील पीपीएमएस गोल्ड येथे पायी घेऊन जात होते.
मोती चौका जवळील पुष्पम गोल्ड या दुकानासमोर फुटपाथवरून जाताना त्यांच्याजवळ आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांना पत्ता विचारण्याचा बहाना केला. त्याच दरम्यान दुसऱ्या व्यक्तीने त्यांना पाठीमागून धक्का देत त्यांच्या हातातील तांबड्या रंगाची कापडी पिशवी हिसकावली. त्यानंतर दोन्ही चोरट्यानी तेथून पलायन केले.
या संदर्भात चिरंजीत बाग (वय २३ वर्ष, रा. रविवार पेठ, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फरासखाना पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्याविरुद्ध रात्री उशिराने भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुजा देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस अज्ञात दागिने चोरांचा शोध घेत आहे.
