मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी –
सराईत गुन्हेगार असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील शाहरुख रज्जाक शेख (वय ३२, रा. खैरी, ता. श्रीरामपूर) याला अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने गावठी कट्ट्यासह पकडले आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल, चार जिवंत काडतुस, एक टोयोटा कंपनीची फॉरच्युनर, एक मोबाईल असा एकुण १० लाख ७४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अहिल्यानगरचे पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, बाळासाहेब खेडकर, सागर ससाणे, अमोल कोतकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड व महादेव भांड यांना अवैध धंदयाची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत सराईत गुन्हेगार शाहरूख शेख फॉर्चुनर गाडी क्रमांक (एम-०४-एफ-४७७१) मधुन बेलापूर येथुन टिळकनगर, श्रीरामपूर येथे गावठी कट्टासह येत असल्याची माहिती मिळाली होती.
पथकाने मिळालेल्या माहितीवरून बेलापूर ते टिळकनगर रोडवरील कुऱ्हे वस्तीजवळ सापळा रचून सराईत गुन्हेगार शाहरूख शेखला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता एक गावठी पिस्तुल, चार जिवंत काडतुस आढळले. आरोपीस अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने तीन महिन्यापुर्वी अशोकनगरकडे जाणारे उड्डाणपुलावर एक इसमावर गावठी कट्टातुन गोळीबार केला असल्याची कबुली दिली आहे.
सराईत गुन्हेगार शाहरूख शेखच्या विरोधात श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी, नारायणगाव (जि. पुणे) पोलिसात प्राणघातक हल्ला, जबरी चोरी, लूटमार, चोरी, अवैधरीत्या शस्त्र बाळगणे यासारखे १० गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.


