संगमनेर, दि. २१ फेब्रुवारी –
बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारा कागद तस्करीच्या रूपाने बाहेरच्या देशातून कुरियर कंपनीच्या माध्यमातून भारतात आला असून तो संगमनेरमध्ये देखील आल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच पुण्याच्या डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यु इंटीलिजन्सच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने टाकलेल्या छाप्यात बनावट नोटा बाजारात येण्यापूर्वीच थांबविण्यात यश आले आहे.
संगमनेरमधील रजनीकांत राजेंद्र राहणे (रा. राहणे मळा गुंजाळवाडी) हा त्याच्या राहत्या घरी भारतीय चलनातील खोट्या नोटा बनवत असल्याची खात्रीशीर माहिती समोर आल्यानंतर पथकाने संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंजाळवाडी शिवारामध्ये गुरुवारी सकाळी ही कारवाई केली. कारवाईदरम्यान रजनीकांत राहणे याला पकडण्यात आले.
राहणे याने हाय सेक्युरिटी थ्रेड असलेली रंगीत पट्टी असलेले पेपरचा वापर करुन एच पी कंपनीचा मॉडेल नं. Smart Tank 585 All in One printer Sr-No-TH4608WOXR या प्रिंटरचा वापर करुन भारतीय चलनातील खोट्या नोटा बनवण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे.
बाहेरच्या देशातून मोठ्या प्रमाणावर हाय सिक्युरिटी आरबीआय ट्रेड पेपर (खोट्या नोटा बनविण्यासाठी वापरण्यात येणारा) भारत सरकारची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात महसुली नुकसान करत डीटीडीसी या कुरिअर कंपनीमार्फत देशभरात पाठवण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. सदर कंपनीमार्फत हा पेपर संगमनेर मध्ये सुद्धा पाठविण्यात आल्याची व पेपरची ऑर्डर डिलिव्हर झाल्याची माहिती संमतीत विभागाला मिळाल्यानंतर कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.
पुण्याच्या डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यु इंटीलिजन्सचे वरिष्ठ अधिकारी झाकीर हुसेन मुल्ला, अजय अथविया, पवन पहलवार महिला अधिकारी ज्योती विचारे या अधिकाऱ्यांच्या पथकाने संगमनेरमध्ये येत पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे यांच्या संयुक्त पथकाने गुंजाळवाडी शिवारात कारवाई केली.
कारवाईदरम्यान पथकाला घराच्या पहिल्या मजल्यावर असणाऱ्या एका खोलीत प्लास्टिक पिशवीमध्ये A-4 साईजचे शंभर पेपर आढळून आले. त्या पेपरची पाहणी केली असता हाय सिक्युरिटी ग्रेड असलेली रंगीत पट्टीदेखील त्या ठिकाणी दिसून आली. त्यावरून सदर पेपर भारतीय चलनातील खोट्या नोटा बनविण्यासाठी वापरत असल्याची पथकाची खात्री झाली. तसेच पथकाला एका प्लास्टिकच्या कचऱ्याच्या डब्यात शंभर आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. त्या व्यवस्थित छापल्या गेल्या नसल्याने फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकण्यात आल्या होत्या.
पथकाने रजनीकांत राजेंद्र रहाणे (रा. राहणेमळा, गुंजाळवाडी, पोस्ट राजापुर, संगमनेर, जि. अहिल्यानगर) यास ताब्यात घेवुन त्याच्या विरुध्द संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं. १२३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १७८, १८१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी करित आहेत.


