
संगमनेर, दि. २ एप्रिल – प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यात बुधवारी (दि. २) दुपारी साडेतीन ते पाच वाजेच्या दरम्यान जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे तालुक्यातील सावरगाव तळ, निमज, धांदरफळ, नांदुरी दुमाला, पेमगिरी आणि कौठे धांदरफळ या गावांना मोठा फटका बसला. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, कौठे धांदरफळ येथे वीज पडून दोन गाईंचा मृत्यू झाला आहे.
अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, उन्हाळी बाजरी, हरभरा, कांदा आणि चारा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कौठे धांदरफळ येथे निवृत्ती रखमा घुले यांच्या दोन गाईंवर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले असून, ओढे-नाले आणि डोंगर कड्यांवरून पाणी वाहत आहे.
आमदार अमोल खताळ यांनी तहसीलदार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी आमदार खताळ हे स्वतः नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अवकाळी पावसामुळे संगमनेर शहर आणि परिसरातही पाणी साचले होते. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यात उष्णतेचे प्रमाण वाढले होते.


