संगमनेर: तालुक्यात जून महिना कोरडा गेल्यावर जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून, गेल्या दहा ते बारा दिवसांत सुमारे ७५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील २५,०२४.८ हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत एकूण २५ हजार ४.८ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक कल सोयाबीन आणि मका लागवडीकडे असून, बाजरीच्या क्षेत्रात मात्र घट झाली आहे.
निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळाल्याने काही भागात ऊस लागवडही वाढत आहे, तर बदलत्या वातावरणामुळे शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या भाजीपाला पिकांकडे वळत आहेत.
सध्या तालुक्यात सोयाबीन ८,९४७.१ हेक्टर, मका ९,३४६ हेक्टर, बाजरी ३,६२५.९ हेक्टर, कापूस १,५९१ हेक्टर, भुईमूग ४७५ हेक्टर, जुनी व नवीन ऊस लागवड ७०७ हेक्टर आणि इतर भाजीपाला पिके ३३२.८ हेक्टरवर घेण्यात आली आहेत. दरम्यान, १ ते १० जुलै या कालावधीत तालुक्यात केवळ ३५ मिमी पावसाची नोंद झाली असून, त्यानंतर पावसाने मोठी उघडीप दिली आहे.
ज्या भागात पाऊस कमी झाला तिथे पेरण्या खोळंबल्या आहेत, तर पेरणी झालेल्या भागात पिके जगवण्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. कृषी विभागाने सर्व शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी आपला पीक विमा काढून घेण्याचे आवाहन केले आहे. पाऊस अधिक लांबल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली असून, सध्या बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.