Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रविवार विशेष लेख… मुर्खांनो आता तरी शहाणे व्हा रे!
विश्लेषण

रविवार विशेष लेख… मुर्खांनो आता तरी शहाणे व्हा रे!

लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/04/2025No Comments5 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

काश्मीरचं नंदनवन असलेल्या पहेलगामच्या मिनी स्वीझर्लंडवरील दहशतवादी हल्ल्याने सारा देश हादरून गेला नसल्यास नवलच. आजवरच्या हल्ल्यांची परिसिमा गाठलेला हल्ला म्हणून या हल्ल्याकडे पहावं लागेल. दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर हल्ले झाले, पण असा हल्ला झाला नव्हता. 2005 च्या एप्रिल महिन्यात श्रीनगरमधील पर्यटन केंद्रात बॉम्बस्फोट घडवून केलेल्या घातपातात एका महिलेचा मृत्यू ओढवल्यानंतर काही अपवादात्मक घटना जरूर घडल्या. मात्र पर्यटकांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं असं पाहायला मिळालं नव्हतं. दहशतवादी सुरक्षा रक्षकांना आणि सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या कॅम्पला लक्ष्य करायचे. पर्यटकांना लक्ष्य केलं आणि पर्यटकांचा काश्मीरमधील ओघ कमी झाला तर ज्यांच्या मदतीने हे आपण घडवत आलो तेच आपल्या विरोधात जातील, अशा भीतीने दहशतवादी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांवर हल्ले करत नसत. पहेलगामच्या घटनेने याला छेद दिला आहे.

हा हल्ला अमानवी आहेच शिवाय माणुसकीला काळिमाही फासणारा आहे. ठरवून, उमगून पंतप्रधान मोदींचं नाव घ्यायचं, हिंदू म्हणून त्यावर गोळ्या चालवल्या. समाजात दुही निर्माण करण्याचं हे उत्तम दहशतवादी साधन. जितका गंभीर तितकाच काश्मीरींच्या अस्तित्वाला धक्का पोहोचवणारा हा हल्ला होता.

हरएक ठिकाणी या हल्ल्याची निंदा होते आहे. कधी नव्हे ती काश्मीर खोर्‍यातल्या गावागावातही या घटनेचा निषेध होतो आहे. आजवर असा निषेध करण्याची मानसिकता काश्मीरच्या जनतेत नव्हती. एकीकडे दहशवाद्यांच्या रालफल कानफटावर उगारलेल्या असताना दुसरीकडे सुरक्षा दलांचा ससेमिरा काश्मीरींच्या पाचवीला पुजला होता. तिथल्या लोकांचं अक्षरश: सँडवीच झालं होतं. ही परिस्थिती बदलत असल्याचं चित्र यानिमित्ताने पुढे आलं आहे. तरीही याचं राजकारण करणार्‍या मुर्खांनी धर्मा-धर्मात तेढ निर्माण करण्याचा डाव सोडला नाही. हिंदू असल्याचं वदवून मारल्याचं निमित्त करत हे धर्मवेडे गंभीर घटनेचंही राजकारण करू लागले आहेत. हल्ला झाल्यानंतर वाहिन्यांनी लावलेली धार्मिक आग लपून राहिली नाही. पहेलगामच्या या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे, हे सांगण्यासाठी आता कोणाची साक्ष घेण्याची आवश्यकता नाही. हा हल्ला ठरवून झाला की आणखी कसा, याचं अनुमान काढणारे अनेकजण आजही शंका उपस्थित करत आहेत. केंद्रातल्या सरकारचा आजवरचा अनुभव लक्षात घेता या शंका गैर आहेत, असं म्हणता येत नाही.

सुरक्षा दलावरील पुलवामाचा हल्ला हा काश्मिरमधील अति शक्तीशाली आणि तितकाच तो भारताला आव्हान देणारा हल्ला होता. भारताच्या सुरक्षा दलातील त्रुटींची आणि गुप्तचरांच्या अपयशाचा या हल्ल्याने पुरता पोलखोल करून टाकला होता. काही घडवण्यासाठी अशा त्रुटी जाणीवपूर्वक मागे ठेवल्या जातात, अशा शंकांना वाव देणार्‍या चर्चा उघडपणे केल्या जात आहेत. 14 फेब्रुवारी 2019 या दिवशी पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यात 42 भारतीय जवानांना जीव गमवावा लागला होता. या घटनेचं गांभीर्य सरकारने अपेक्षेप्रमाणे घेतलं नाही. या घटनेची साधी चौकशी झाली नाही. यामुळे त्याचा अहवाल येण्याचा विषयच नव्हता. त्याआधी उरीच्या दहशतवादी हल्ल्यात 19 जवान जिवास मुकले. पुलवामाच्या हल्ल्यानंतर म्हणजे 26 फेब्रुवारी 2019 भारतीय लष्कराने बालाकोटचा एअर स्ट्राईक केला. मात्र तरीही पुलवामाच्या हल्ल्याची चर्चा थांबली नाही. जेव्हा हा हल्ला झाला त्याकाळी जम्मू काश्मीरच्या राज्यपालपदी असलेले सत्यपाल मलिक यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा भांडाफोड केला. सरकारची नीती प्रामाणिक असती तर या हल्ल्याची निश्‍चितच चौकशी झाली असती.

ज्याअर्थी चौकशी होऊ शकत नाही, त्याअर्थी सरकारच्या प्रामाणिपणावर संशय घेतला जाणं स्वाभाविकच होय. यातून  दहशतवाद्यांविषयीची सरकारची नीती स्पष्ट होते. येणार्‍या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा हल्ला घडवला गेला, असा गंभीर आरोप तेव्हा केला जात होता आणि आताही केला जात आहे. ज्याचं उत्तर मिळण्याची शक्यता नाही. पहेलगामच्या हल्ल्यानंतर सरकार अशा घटनांचं राजकारण करणार नाही, अशी अपेक्षा ठेवण्याइतकी परिस्थिती सामान्य राहिलेली नाही. पठाणकोटच्या लष्करी छावणीवरील हल्ला असो की रामबनच्या लष्करी तळावरील हल्ला असो. संधी मिळाली तेव्हा उत्तर देण्यात आलं. मात्र पुलवामाच्या हल्ल्याकडे सरकारने इतकं दुर्लक्ष का केलं हा प्रश्‍न आजही अनुत्तरीत आहे. या पार्श्‍वभूमीवर पहेलगामच्या हल्ल्याकडे पहावं लागेल. पुलवामातील हल्लेखोरांना यमसदनी पाठवलं असतं तर सुरक्षा दलांची जरब राहिली असती.

आपण भारताचे अविभाज्य घटक आहोत, हे काश्मिरी जनतेला कळून चुकलं आहे. असं सकारात्मक चित्र असताना काही मूर्ख हल्ल्यामागच्या कथांचं कवित्व सांगत धर्माची भाषा बोलू लागले आहेत. दहशतवाद्यांना जात, धर्म नसतो. दहशत निर्माण करणं हा एकमेव हेतू त्यांचा असतो. हा हेतू पूर्णत्वास नेण्यासाठी जे कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे स्पष्ट असताना हिंदू असल्याचं वदवून दहशतवादी गोळ्या झाडत असल्याच्या कृतीवर हे मुर्ख बोट ठेवत आहेत. हल्ल्यानंतर पर्यटकांच्या बचावासाठी साहसाने मदत करणार्‍या काश्मिरी जनतेचं हल्ल्यातून बचावलेले तोंडभरून कौतुक करत आहेत. लोड केलेली दहशतवाद्याकडील रायफल खेचून पर्यटकाचा बचाव करताना सैय्यत आदीलचा बळी गेला, याचंही भान या विकृतांना नाही. हिंदू-मुस्लिम करणार्‍यांना हल्ला का झाला याचं उत्तर नको आहे. कारण याच उत्तरात सरकारचा पोल खोलला जाऊ शकतो. बैसरन खोर्‍याकडे पर्यटकांना जायला कशाला हवं ते काश्मीरमध्ये जाणार्‍यांची अक्कल काढणार्‍या या मंडळींना काश्मीरचं महत्वच कळलेलं दिसत नाही.

पर्यटक तिथे जातात याचा अर्थ समजून घ्यायला हवा होता. एकाकी असलेलं हे ठिकाण म्हणजे पहेलगामची जन्नत होय. अरू व्हॅली, पाईन फॉरेस्ट, चंदनवारी, शेषनाग तलाव, लिडर नदी ही पहेलगाममधील ठिकाणं भारतीय चित्रपटांची जननीच. मिनी स्वीझर्लंड म्हणून नावाजलेल्या बैसरन खोर्‍याला भेट दिली नाही तर पहेलगाम भेट निकामी मानली जाते. अशावेळी तिथे भेट देणार्‍या पर्यटकांना तिथे जाऊ नका, असं सांगणारे एकतर अर्धवट असावेत किंवा अपयशी ठरलेल्या सरकारचा त्यांना बचाव करायचा असावा. काश्मीरमधील पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढवणं ही खरी तर सरकारची जबाबदारी होय. त्याऐवजी तिथे जाऊ नका, असं सांगणार्‍यांची मुस्कटंच फोडायला हवीत. जिथे निर्जन तिथे सौंदर्य हे काश्मीरचं खरं रूप. अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक नसणं हे दहशतवाद्यांच्या कारवायांना निमंत्रणच होय. त्यात अमेरिका सरकारच्या प्रतिनिधींची भारत भेट असते तेव्हा असे हल्ले करून त्या देशाचं लक्ष आपल्याकडे वेधण्याची खूमखुमी पाकिस्तानला आहे.

याची जाणीव भारताच्या गुप्तचरांना नाही? अमेरिकेचे उप राष्ट्रपती जे. डी. वॅन्स भारत भेटीवर असताना काश्मीरमधील सुरक्षा अधिक सजग करण्याची आवश्यकता असताना यंत्रणा झोपून राहिल्या. वॅन्स यांच्या भेटीदरम्यान काश्मीरमध्ये घातपात घडवून आणला जाऊ शकतो, याची जाणीव आपल्या गुप्तचरांना नव्हती? असेल तर अमित शहांनी गत आठवड्यात काश्मीरमध्ये येऊन केलं काय? या बैठकांमधून काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना दूर का ठेवण्यात आलं? संविधानाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला बैठकीपासून दूर ठेवणं, यातून जाणार्‍या संदेशाची जाणीव शहांना झाली नाही? दहशतवादी कारवाया झाल्या म्हणून ज्या पाकिस्तानला आपण दोष देतो त्या पाकिस्तान आयएसआयच्या अधिकार्‍यांना पठाणकोटच्या हल्ल्याची माहिती देण्यासाठी पाचारण करण्याचं कारण काय होतं? याचं उत्तर सरकारकडे नाही.

भीषण घटनेवेळी पंतप्रधान मोदी सौदीच्या भेटीवर होते. घटनेचं निमित्त केलं आणि ते देशात परतलेही. पण त्यांना या गंभीर घटनेचं गांभीर्य नव्हतं. एकीकडे देश शोकमग्न असताना पंतप्रधान मोदी बिहारमध्ये निवडणूक सभा घ्यायला गेले होते. हे चित्र मोदींच्या भक्तांना मानवत असेल पण देशाला नाही. त्यांचा एक मित्र भाजपचा नेता निरंजन दुबे आपल्या वाढदिवसासाठी गुलमर्गमध्ये मोठी पार्टी आयोजतो. यासाठी सुरक्षा यंत्रणेला वेठीस धरतो मात्र सामान्य देशवासीयांकडे पहायला सरकारी नेत्यांना वेळ नसतो… काश्मीरच्या सुरक्षा व्यवस्थेचा किती हा विरोधाभास?

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 686
प्रवीण पुरो
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष लेख — अर्बन नक्षल ते दिमागी नक्षल

23/08/2026

रविवार विशेष लेख — शास्त्रज्ञांविरोधी कट हनीट्रॅपिंगचा

16/08/2026

रविवार विशेष लेख — रामाचं सोंग आणि धर्माचं ढोंग!

09/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

By Annant Ppangarkar25/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: कर्म म्हणजे केवळ जगण्याची धावपळ किंवा जबाबदारीची पूर्तता…

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.