

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त
संगमनेर, प्रतिनिधी:
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्याची जोरदार मागणी केली. तसेच, राज्यघटनेवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध करत सर्वांनी एकत्रित येऊन याविरोधात आवाज उठवण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त संगमनेर बसस्थानकासमोर मातंग एकता समाज व सकल मातंग समाजाच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात थोरात बोलत होते. यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनाही अभिवादन करण्यात आले.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांसारख्या संतांना आणि समाजसुधारकांना त्रास देणारी धर्मांध शक्ती आजही समाजात कार्यरत आहे. याच शक्तींनी महात्मा गांधी यांची हत्या केली. अशा दुही निर्माण करणाऱ्या शक्तींना वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे.
थोरात यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अण्णाभाऊ साठे यांच्या योगदानाला उजाळा देत, सध्या राज्याबाहेर चाललेल्या उद्योगांवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, आपल्या राज्यघटनेत सर्व संतांचे विचार सामावलेले आहेत. या राज्यघटनेचे संरक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राज्यघटनेवर होत असलेल्या आघातांविरुद्ध सर्वांनी संघटित होऊन लढा दिला पाहिजे.
यावेळी त्यांनी मातंग समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं. थोरात म्हणाले की, या समाजाने सर्वप्रथम शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे आणि यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं. शिक्षणाची ही चळवळ अधिक समृद्ध करून गोरगरीबांच्या जीवनात आनंद निर्माण करावा.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांचा आहे. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे. त्यांनी ज्या समतेसाठी आवाज उठवला, त्याच समतेसाठी आज पुन्हा आवाज उठवण्याची गरज आहे. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करावं.
या कार्यक्रमाला ज्ञानेश्वर राक्षे, विश्वास मुर्तडक, अमर कतारी, प्रमिला अभंग, प्रा. बाबा खरात, राजेंद्र आव्हाड, दत्ता लाहुंडे, किशोर साळवे, संदीप आव्हाड, संजय जमदाडे, बाबासाहेब साळवे, बापू लहूनडे, गणेश बलसाने, शिवाजी आव्हाड, मनीष राक्षे, वेदांत राक्षे, राजेंद्र राक्षे, विकी पवार, देवेंद्र साळवे, सचिन शेलार, विनोद साळवे, शुभम आव्हाड, किशोर आव्हाड, संतोष गायकवाड, विश्वनाथ आव्हाड, जगन्नाथ आव्हाड, डि. के. जाधव यांच्यासह काँग्रेस आणि मातंग समाजाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेरमध्ये अण्णाभाऊंचे भव्य स्मारक
या कार्यक्रमावेळी ज्ञानेश्वर राक्षे यांनी बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले. ते म्हणाले की, थोरात यांनी नेहमीच गोरगरीब लोकांसाठी काम केलं आहे. त्यांच्या प्रयत्नातून संगमनेरमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी नवीन नगर रस्त्यावर एक महत्त्वाची जागा मिळाली आहे. या ठिकाणी सध्या एक वाचनालय सुरू आहे, भविष्यात इथे अद्ययावत ग्रंथालय उभारून उपेक्षित समाजातील विद्यार्थ्यांना ज्ञानाचं केंद्र उपलब्ध करून दिलं जाईल, असंही राक्षे यांनी सांगितलं.



थोरात यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील
