

श्रीरामपूर –
शहरातील वर्दळीच्या भागात आज दुपारी झालेल्या एका थरारक गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण श्रीरामपूर शहर हादरून गेले आहे. कब्रस्तानातील अंत्यविधी आटोपून घरी परतणारे राजकीय कार्यकर्ते असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जहागीरदार यांचा अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेनंतर कामगार हॉस्पिटल, सय्यद बाबा चौक आणि मौलाना आझाद चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या घटनेमुळे शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी अडीचच्या सुमारास बंटी जहागीरदार हे त्यांचे मित्र अमीन हाजी यांच्यासोबत दुचाकीवरून घरी परतत होते. संत लूक हॉस्पिटलच्या ओपीडी गेटजवळ दबा धरून बसलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला एका हल्लेखोराने त्यांच्या दिशेने दगड फेकला. दगड लागल्याने जहागीरदार दुचाकीवरून खाली उतरले. त्यांनी प्रतिकार म्हणून तोच दगड हल्लेखोरांच्या दिशेने भिरकावला, मात्र त्याच क्षणी हल्लेखोरांनी पिस्तूल काढून त्यांच्यावर बेछूट गोळीबार सुरू केला.
हल्लेखोरांनी अतिशय जवळून जहागीरदार यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांच्या पोटात, पायाला आणि पाठीला गंभीर जखमा झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या जहागीरदार यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने कामगार रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ. जगधने व त्यांच्या पथकाने प्राथमिक उपचार केले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने ‘कार्डियाक रुग्णवाहिके’द्वारे नगरला हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
बंटी जहागीरदार यांची राजकीय पार्श्वभूमी मोठी होती. त्यांच्या आई राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका होत्या, तर त्यांच्या भावजई नुकत्याच काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. श्रीरामपूर नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आणण्यात बंटी जहागीरदार यांचा सिंहाचा वाटा मानला जात असे. या हत्येमागे राजकीय वैमनस्य आहे की जुना वैयक्तिक वाद, याबाबत आता शहरात चर्चांना उधाण आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तातडीने शहरात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या शोधासाठी पाच विशेष पथके तैनात करण्यात आली असून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. हल्लेखोरांना लवकरच अटक केली जाईल, नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.



