संगमनेर (प्रतिनिधी):
नवीन लोकप्रतिनिधीचा कट्टर समर्थक अशी बिरूदावली मिरवून, स्वतःची लायकी नसताना सातत्याने कोणावरही अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या दिनेश फटांगरे या विकृत माणसाला तात्काळ अटक करावी, अशी मागणी संगमनेर तालुका काँग्रेससह तालुक्यातील तरुणांनी केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनानंतर त्यांच्यावरही अत्यंत खालच्या भाषेत टीका केल्याने संगमनेर तालुक्यातून मोठी संतापाची लाट उठली असून, या प्रवृत्तीविरोधात आता नगरसेवकांसह नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
याबाबत संगमनेर तालुक्यातील तरुणांनी संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या देत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनेश फटांगरे या विकृत व विध्वंसक प्रवृत्तीने सातत्याने चांगल्या गोष्टींना विरोध केला आहे. सध्याचे नवीन लोकप्रतिनिधी यांचा कट्टर समर्थक म्हणून वावरताना त्याने शिंदे शिवसेना शहर प्रमुख म्हणून तालुक्यात दडपशाही निर्माण करण्याचा आणि प्रशासनावरही धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. याच दडपशाहीमुळे प्रशासनाने त्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही.
या विकृत माणसाने राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांच्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत टीका केली आणि त्यानंतर मात्र संगमनेर तालुका पेटला. जनक्षोभ पाहून फटांगरेला पदावरून हटवण्याची कारवाई करण्यात आली असली तरी, ते जनतेला रुचलेले नाही. पद गेल्यानंतरही फटांगरेने आपला उन्माद सुरूच ठेवला असून आमदार सत्यजित तांबे यांच्यावरही आक्षेपार्ह टीका केली आहे.
फटांगरे हा सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्तिगत आणि चारित्र्यावर शिंतोडे उडवणारी टीका करत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे समाजातील शांतता धोक्यात आली आहे. अशा वाईट प्रवृत्तीला तात्काळ बेड्या ठोकल्या जाव्यात, या मागणीसाठी सर्व तरुण पोलीस स्टेशनसमोर एकवटले होते.
यावेळी निखिल पापडेजा, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, नगरसेवक नितीन अभंग, नगरसेवक शैलेश कलंत्री, नगरसेवक डॉ. दानिश खान, नगरसेवक किशोर टोकसे, दत्ता कोकणे, गणेश मादास, शुभम परदेशी, विनायक गरुडकर, डॉ. सातपुते, बाळासाहेब पवार, अमित गुंजाळ, जावेद पठाण, प्रथमेश गरुडकर, संतोष मांडेकर, अंबादास आडेप, किशोर बोऱ्हाडे, संदीप लोहे, ॲड. सुहास आहेर, राम अरगडे, नगरसेवक गजेंद्र अभंग, नगरसेवक गणेश गुंजाळ, नगरसेवक सौरभ कासार, संजय पगडाल, अंकुश ताजने, विजय पांढरे, सुमित पवार, संकेत कोकणे, सागर कानकाटे, शुभम परदेशी आणि अमजद शेख यांच्यासह तालुक्यातील विविध पक्षांचे कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे निवेदन सर्व युवकांनी पोलीस निरीक्षक बारवकर व पोलीस उपविभागीय अधिकारी सोनवणे यांना दिले आहे. जर या विकृत प्रवृत्तीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून त्याला अटक केली नाही, तर संगमनेर शहर बंद ठेवून तीव्र स्वरूपाचा ‘रास्ता रोको’ करण्याचा इशारा संगमनेरमधील तरुणांनी दिला आहे.
आमदार तांबे, माजी मंत्री थोरात यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्षांची फटांगरे विरोधात तक्रार…
राजकीय नेत्यांबाबत सोशल मीडियावर बदनामीकारक आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शिवसेनेचा माजी शहर प्रमुख दिनेश फटांगरे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष अरुण सहादु गावित्रे (वय ६१, रा. अकोले रोड, संगमनेर) यांनी ही तक्रार दिली आहे. गावित्रे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, २९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ते घरी असताना, त्यांच्या फेसबुक अकाउंटवर आरोपी दिनेश भीमाशंकर फटांगरे (रा. शिवाजीनगर, ता. संगमनेर) याने एक पोस्ट शेअर केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या पोस्टमध्ये विद्यमान आमदार सत्यजित तांबे आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह, बदनामीकारक आणि चुकीचा मजकूर लिहिलेला होता. या मजकुरामुळे लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला असून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार गावित्रे यांनी दिली आहे.
या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलिसांनी दिनेश फटांगरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५६(२) अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर नवनाथ बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.
खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या दिनेश फटांगरेला अटक करा; संगमनेरची तरुणाई एकवटली, शहर बंदचा इशारा
आमदार तांबे, माजी मंत्री थोरात यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्षांची फटांगरे विरोधात तक्रार...







