श्रीरामपूर:
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अवैध दारू विक्री विरोधात धडक मोहीम हाती घेतली असून, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी राहाता तालुक्यातील निमगाव एम.आय.डी.सी. परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. २ श्रीरामपूर यांनी या मोहिमेत हातभट्टीच्या गावठी दारूने भरलेले एक चारचाकी वाहन पकडले आहे.
या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या वाहनाचा क्रमांक MH.05.AJ.5794 असून, त्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू आढळून आली. याप्रकरणी आरोपी आकाश गोरख गायकवाड (रा. गोंधवणी, ता. श्रीरामपूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेली गाडी आणि दारू असा एकूण १,३०,५०० रुपयांचा मुद्देमाल विभागाने ताब्यात घेतला आहे.
सदरची यशस्वी कारवाई अधीक्षक प्रमोद सोनोने (अहिल्यानगर क्र. १) आणि अधीक्षक ऋषिकेश इंगळे (अहिल्यानगर क्र. २) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकामध्ये निरीक्षक एस. एस. हांडे, दुय्यम निरीक्षक एस. सी. मांडवेकर, पी. एस. पाटील, आर. बी. गायकवाड, के. एम. सुळे तसेच जवान एस. एस. गारळे, एस. एस. लवांडे, पी. विटकरे, बी. पी. काळे, जी. बी. ढेपले आणि हर्षदा कदम यांचा सहभाग होता. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक एस. एस. हांडे करत आहेत.







