संगमनेर, प्रतिनिधी –
येथील पंचायत समिती जवळ असलेल्या ‘किसान ऑटोमोबाईल्स’च्या नवीन स्पेअर पार्टसच्या गोडाऊनला आज सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत गोडाऊनमधील नवीन मोटार पार्टस जळून खाक झाले असून, अंदाजे लाखो रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे.
प्रत्यक्षदर्शींने दिलेल्या माहितीनुसार शेख शोएब फरीद यांच्या मालकीचे हे किसान ऑटोमोबाईल्सचे गोडाऊन असून, अचानक लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. गोडाऊनमध्ये ऑईल आणि रबरी पार्टस असल्याने आगीची तीव्रता प्रचंड वाढली होती.
घटनेची माहिती देऊनही अग्निशमन दलाची गाडी पोहोचण्यास तब्बल दीड तासाचा विलंब झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, नगरपालिकेचे अग्निशमन दल येण्यापूर्वी थोरात कारखान्याच्या फायर फायटरने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर नगरपालिकेचे पथकदेखील दाखल झाले.
अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापही आग पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे, परंतु शेख शोएब फरीद यांचे मोठे व्यावसायिक नुकसान झाले आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस निरीक्षक समीर बारवकर देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.







