संगमनेर, प्रतिनिधी –
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर सोशल मीडियावर विकृत पोस्ट टाकणारा शिवसेना शिंदे गटाचा माजी शहरप्रमुख दिनेश फटांगरे याच्यावर सलग दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेची बातमी प्रसिद्ध केल्याचा राग धरून त्याने ‘दैनिक युवावार्ता’चे संपादक किसन भाऊ हासे यांच्यावर फेसबुकच्या माध्यमातून अत्यंत खालच्या पातळीवर अश्लील आणि बदनामीकारक पोस्ट केली होती. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ‘पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत’ पहिला गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण तालुक्यात या फटांगरे विरोधात संतापाची लाट उसळली आहे.
दिनेश फटांगरे केवळ संपादकांची बदनामी करून थांबला नाही, तर त्याने विधानपरिषद आमदार सत्यजित तांबे यांच्यावरही गलिच्छ भाषेत टीका केली आहे.
या विकृतीचा निषेध करत कारवाईच्या मागणीसाठी २९ जानेवारी २०२६ रोजी विविध सामाजिक संघटना, पत्रकार आणि राजकीय पदाधिकारी यांनी पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे व शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांची भेट घेतली. यावेळी लेखी निवेदन देऊन आवश्यक पुरावे सादर करण्यात आले. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती व प्रसारमाध्यम संस्था अधिनियम २०१७ च्या कलम ४ सह भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५१, ३५२, ३५३(१) आणि ३५६(१) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मागील एक वर्षापासून फटांगरे हा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिष्ठित नागरिकांना लक्ष्य करत असून, अनेक आक्षेपार्ह पोस्ट टाकत असल्याच्या तक्रारी आहेत. आमदार अमोल खताळ यांनी वारंवार समज देऊनही त्याने आपले उद्योग सुरूच ठेवले, यामुळे शिवसेनेने त्याची पदावरून हकालपट्टी केली असली, तरी त्याला पक्षातूनही कायमचे निष्कासित करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. सलग दोन दिवस गुन्हे दाखल होऊनही आरोपीवर कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत आणि अन्यायाविरुद्ध भूमिका मांडणे हे आमचे कर्तव्य आहे. केवळ बातमी प्रसिद्ध केली म्हणून वैयक्तिक पातळीवर केली जाणारी ही अश्लील टीका संपूर्ण पत्रकारितेची बदनामी करणारी आहे. अशा विकृत इसमावर पोलिसांनी तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करून समाजाला एक ठोस संदेश द्यावा. – किसन भाऊ हासे, संपादक दैनिक युवावार्ता.






