
संगमनेर, प्रतिनिधी –
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या लोकशाहीत विचारांची देवाणघेवाण आणि निरोगी राजकीय स्पर्धा अभिप्रेत होती. मात्र, आज राज्याच्या राजकारणात जे काही सुरू आहे, ते अत्यंत विदारक आहे. सत्तेसाठीची ही जीवघेणी स्पर्धा आणि निष्ठावंतांचा गळा घोटण्याची वृत्ती महाराष्ट्राला एका चुकीच्या वळणावर घेऊन जात आहे, अशा शब्दांत माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील सद्य राजकीय स्थितीवर आपली तीव्र चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी राज्यातील अस्थिर राजकारणावर भाष्य करतानाच संगमनेरच्या सुसंस्कृत परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत राज्यातील हा ट्रेंड संगमनेरमध्ये येऊ न देता संगमनेरने आपले वेगळेपण जपण्याचे आवाहन केले.
संगमनेर नगरपालिकेच्या प्रांगणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधत नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर मैत्रिणी तांबे आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ नगरपालिकेत पार पडला यावेळी ते बोलत होते.
थोरात पुढे म्हणाले की, आजच्या राजकारणात पक्षांतर्गत गोंधळ वाढला असून तिकिटांसाठी सुरू असलेली ओढाताण, बाहेरच्यांना दिली जाणारी संधी आणि त्यामुळे मूळ कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय यामुळे जनसामान्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. भांडण, तंटे आणि मारामारी इथपर्यंत गेलेली ही सत्तेची चढाओढ महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसा नाही. संगमनेरने मात्र नेहमीच सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श राज्याला दिला आहे, आणि तो आपल्याला जपायचा आहे.
१९९१ पासून डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपालिकेने विकासाचे नवनवीन टप्पे गाठले आहेत. “हॅपी हायवे” आणि शहरातील सुसज्ज “बस स्थानक” ही त्याची जिवंत उदाहरणे आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून केवळ स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी काही लोक फ्लेक्स लावून शहराचे विद्रुपीकरण करत आहेत, याबद्दल थोरातांनी कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली. स्वच्छता आणि बंधुभाव हीच आपली खरी ओळख असल्याचे त्यांनी यावेळी निक्षून सांगितले.

बस स्थानकाच्या विद्रुपीकरणावरून थोरातांनी विरोधकांचे कान टोचले; संगमनेरच्या स्वच्छतेचे केले कौतुक – बस स्थानकाच्या परिसरात प्रसिद्धीसाठी अनधिकृत फ्लेक्स लावले गेले. हे फ्लेक्स फाटून लोंबकळत असतानाही ते काढण्याची तसदी घेतली गेली नाही. जनतेचे कल्याण करायचे असेल तर ते जमिनीवर राहून काम करून करावे लागते, फ्लेक्स लावून नाही. संगमनेर सेवा समितीने सुरू केलेले स्वच्छतेचे काम हा केवळ ‘इव्हेंट’ न ठेवता ती एक संस्कृती म्हणून जोपासावी.
या सोहळ्याला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, ज्येष्ठ उद्योगपती राजेश मालपाणी, जर्मनीच्या माजी खासदार क्लोडिया नॉलटे, गिरीश मालपाणी, मनीष मालपाणी, अमर कतारी, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, मुख्याधिकारी दयानंद गोरे यांसह अनेक विभागांचे अधिकारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले. सूत्रसंचालन सुविधा अरासिद्ध व शोभा हजारे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रमिला अभंग यांनी मानले.

सत्तेसाठी चाललेला धुमाकूळ महाराष्ट्राला घातक; संगमनेरने सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श, आपले वेगळेपण जपावे! – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
गेल्या काही काळापासून केवळ स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी काही लोक फ्लेक्स लावून शहराचे विद्रुपीकरण करत आहेत, याबद्दल थोरातांनी कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली.

