संगमनेर, प्रतिनिधी –
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करणे शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखाला चांगलेच महागात पडले आहे. फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) शहर प्रमुख दिनेश भीमाशंकर फटांगरे याची आमदार अमोल खताळ यांच्या आदेशावरून पक्षातून तातडीने हकालपट्टी करण्यात आली असून, आता त्याच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
आज सकाळी अजित पवार यांच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त होत असतानाच, दुपारी दिनेश भीमाशंकर फटांगरे याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून “जसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर” अशा आशयाची पोस्ट प्रसिद्ध केली.
ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरताच राजकीय वर्तुळात संतप्त पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. या पोस्टमुळे समाजात तणाव निर्माण होऊन दोन राजकीय गटांमध्ये वाद किंवा दंगल घडावी आणि मृत नेत्याच्या प्रतिमेला बाधा पोहोचावी, असा हेतू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या कृत्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाल्याने या घटनेचे गांभीर्य ओळखून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (उत्तर जिल्हा) महिला अध्यक्ष वैशाली सुनील राऊत यांनी तत्काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, पोलिसांनी दिनेश फटांगरे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५२, ३५३(२) आणि ३५६(२) अन्वये गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
दरम्यान, या कृत्याची दखल पक्षानेही घेतली असून संबंधित व्यक्तीची शहर प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याने त्याला दुहेरी दणका बसला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर नवनाथ बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान करत आहेत. सातत्याने अनेकांवर समाज माध्यमातून टीका करून त्यांचे चारित्र्यहनन करणाऱ्या या वादग्रस्त माजी पदाधिकाऱ्यावर पोलीस यासंदर्भात आता नेमकी काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
आक्षेपार्ह पोस्ट भोवली; शिंदे गटाच्या शहर प्रमुखाची पक्षातून हकालपट्टी, पाठोपाठ पोलिसात गुन्हाही दाखल
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर नवनाथ बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान करत आहेत.







