
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर
शहरातील चावडीवरील तलाठी कार्यालयात सुरू असलेला गंभीर गैरप्रकार आमदार अमोल खताळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उघडकीस आणला आहे.
या कार्यालयात दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांची अडवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळले जात असल्याची तक्रार एका महिलेने व्हाट्सअप मेसेजद्वारे आमदारांकडे केली होती. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत आमदार खताळ यांनी तातडीने कार्यालयाला भेट दिली असता, त्याठिकाणी धक्कादायक परिस्थिती पाहायला मिळाली.
शासकीय कर्मचारी उपस्थित नसताना मन्सूर शेख आणि त्यांचा जावई या खाजगी व्यक्ती तेथे बसून अधिकृत कागदपत्रांची हाताळणी करत असल्याचे दिसून आले. यावेळी आमदारांनी संबंधित व्यक्तींना चांगलेच धारेवर धरत त्यांच्या अधिकारांबाबत जाब विचारला.
शासकीय कामकाजात खाजगी व्यक्तींचा अशा प्रकारे होणारा हस्तक्षेप बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत आमदार खताळ यांनी तत्काळ प्रांताधिकारी अरुण उंडे आणि तहसीलदार धीरज मांजरे यांच्याशी संपर्क साधला. संबंधित तलाठ्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
या प्रकाराची सूचना मिळताच प्रशासनाने नायब तहसीलदार भांगरे यांना घटनास्थळी पाठवले. त्यानंतर संबंधित दोघांवर कारवाई करण्यात आली असून भविष्यात अशा खाजगी व्यक्तींना कार्यालयात बसू न देण्याचे आदेश दिले आहेत. एका साध्या मेसेजवर आमदारांनी दाखवलेली ही संवेदनशीलता आणि तत्परता पाहून स्थानिक नागरिकांनी त्यांच्या या कृतीचे मोठे स्वागत केले आहे.

