अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने संयुक्त धडक कारवाई केली आहे. शिवनगर आणि नेहरूनगर परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून चालवल्या जाणाऱ्या कुंटणखान्यांचा पर्दाफाश करण्यात आला असून, या कारवाईत ८ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक हमीद चाँद शेख यांच्या नेतृत्वाखाली तीन विशेष पथके तयार करण्यात आली होती. शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना शिवनगर आणि नेहरूनगर भागात काही व्यक्ती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली.
प्राप्त माहितीच्या आधारे पथकांनी पंचांसमक्ष तिन्ही ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट होताच तिन्ही ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान तीन चालकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या तावडीतून ८ पीडित महिलांची सुरक्षित सुटका करण्यात आली.
या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात निर्मला भाऊसाहेब कदम (वय ५०, रा. शिवनगर), शबाना शरीफोद्दीन सय्यद (रा. नेहरूनगर) आणि अभिनव नंदू अंधारे (वय ३६, रा. शिवनगर) या तिघांविरुद्ध स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ७ आणि ८ अन्वये अनुक्रमे गुन्हे नोंदवही क्रमांक ७३०/२०२६, ७३१/२०२६ आणि ७३२/२०२६ नुसार तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.