Annant Ppangarkar

प्रतिनिधी | संगमनेर
प्रशासनाच्या उघड्या डोळ्यांसमोर चाललेला कारभार आणि निष्काळजीपणामुळे संगमनेर शहरातील रस्ते निष्पाप नागरिकांसाठी मृत्यूचे सापळे बनले आहेत. बस स्थानक ते तीनबत्ती चौक, तीनबत्ती चौक ते प्रवरा नदी पूल आणि तीनबत्ती चौक ते दिल्ली नाका या शहरातील अत्यंत मध्यवर्ती अन् वर्दळीच्या मार्गावर एका निष्पाप महिलेला कंटेनरच्या चाकाखाली चिरडून जीव गमवावा लागला. ही केवळ एक साधी अपघात दुर्घटना नसून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे घडलेला बळी आहे. वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांमुळे संगमनेरकरांचा संयम आता सुटला असून, शहरात संतापाची लाट पसरली आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख यांच्यासह स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (P.W.D.) कार्यकारी अभियंत्यांना थेट निवेदन देऊन प्रशासकीय दिरंगाईवर ताशेरे ओढले आहेत. मध्यवर्ती रस्त्यांवर झालेले अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि रात्रंदिवस धावणारी अवजड वाहने, कंटेनर व ट्रक यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. यापूर्वीही अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाने कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केलेली नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात नागरिकांनी स्पष्ट मागण्या मांडल्या आहेत. बस स्थानक ते तीनबत्ती चौक, प्रवरा नदी पूल ते दिल्ली नाका हा संपूर्ण मार्ग तात्काळ अतिक्रमणमुक्त करून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे. रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून अवैध पार्किंग, अनधिकृत बांधकामे आणि हातगाड्यांवर दंडात्मक कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या अवजड वाहनांवर बंदी घालून पर्यायी मार्ग आणि वेळ मर्यादा लागू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची त्वरित दखल न घेतल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. अतिक्रमणे हटवून रस्ता रुंदीकरणाची प्रक्रिया तात्काळ सुरू केली नाही, तर येत्या काळात रास्ता रोको, धरणे आंदोलन, उपोषण आणि प्रशासनाविरोधात तीव्र निदर्शने केली जातील, असा थेट इशारा नागरिकांनी दिला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवेदनावर नूरमोहम्मद शेख, मोहसीन रशीद शेख, राजू सिताराम काळे, शेख अरबाज अजीज, मुफ्ती सालीम खान, शेख आवेज आणि आजीजभाई ओहरा यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply