Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ग्रामीण भागातील एसटी बसेस मुंबई आणि कोकण मार्गावर वळवल्या आहेत. या धोरणामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील नियमित वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. महामंडळाच्या या तुघलकी कारभारावर संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, रद्द झालेल्या फेऱ्या तातडीने पूर्ववत न झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा परिवहन विभागाला दिला आहे.

कोकणातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त बसेसची सोय करणे ही एसटी महामंडळाची जबाबदारी आहे. मात्र, एका भागातील प्रवाशांची सोय करताना ग्रामीण भागातील हजारो नागरिकांना वेठीस धरणे हा अन्यायकारक कारभार आहे. संगमनेर तालुक्यासह ग्रामीण भागातील अनेक गावांच्या नियमित फेऱ्या अचानक रद्द करण्यात आल्याने विद्यार्थी, महिला, शासकीय कर्मचारी, रुग्ण आणि वृद्ध नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

ग्रामीण भागातील अनेक गावांसाठी एसटी हीच एकमेव सार्वजनिक वाहतुकीची जीवनवाहिनी आहे. दररोज एसटी पासवर शाळा आणि महाविद्यालयात ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे यामुळे सर्वाधिक नुकसान होत आहे. एसटी वेळेवर उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून कुटुंबांवर विनाकारण अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. तसेच शहरातील रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची आणि वृद्धांची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. दुर्गम वाड्या-वस्त्यांवर पर्यायी साधने नसल्याने एक फेरी रद्द झाल्यास नागरिकांना तासनतास बसस्थानकावर ताटकळत राहावे लागत आहे.

परिवहन विभागाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः सकाळच्या शाळा-कॉलेजच्या फेऱ्या, शासकीय कार्यालये व रुग्णालयांच्या वेळेतील फेऱ्या तसेच दुर्गम गावांना जोडणारे मार्ग पूर्ववत सुरू ठेवले पाहिजेत. एसटी प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन रद्द झालेल्या फेऱ्यांची आगारनिहाय पुनर्रचना करावी आणि अतिरिक्त बसेसची सोय करून ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांतील प्रवाशांना दिलासा द्यावा.

नागरिकांच्या या दैनंदिन आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर प्रशासनाने गांभीर्याने निर्णय न घेतल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. एसटी ही ग्रामीण भागाचा पाठीचा कणा आहे. प्रवाशांना त्यांचा हक्काचा प्रवास मिळत नसेल, तर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकतील, असा कडक इशारा अमोल शेलकर यांनी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply