Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –
महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक वाद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि डीजेच्या कर्कश आवाजामुळे होणारे ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीच्या माध्यमातून एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून उद्या, बुधवारी (१६ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाच ते रात्री दहा या वेळेत संगमनेर बस स्थानक परिसरात भव्य ‘महामेळा व महावादन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील वर्षापासून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे संगमनेरमधील ढोल-ताशा पथकांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर मोठी ओळख मिळाली आहे.
यंदाच्या गणेशोत्सवाच्या आनंद पर्वाचे औचित्य साधून आयोजित या सोहळ्यात शहरातील नामांकित पथकांतील ७५० हून अधिक युवक-युवती एकत्र येऊन आपल्या वादनाची कला सादर करणार आहेत. यामध्ये संगमनेरी तांडव, हिंदू राजा प्रतिष्ठान, रुद्र प्रतिष्ठान, छावा प्रतिष्ठान आणि एकलव्य प्रतिष्ठान यांसारख्या प्रतिष्ठित ढोल-ताशा पथकांचा समावेश आहे.
या सोहळ्यास काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, नूर मोहम्मद शेख आणि निखिल पापडेजा यांच्यासह शहर व तालुक्यातील अनेक मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
पारंपारिक लोककलेचा वारसा जपणारा हा सोहळा अनुभवण्यासाठी संगमनेर शहर व परिसरातील नागरिकांनी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने डॉ. मैथिलीताई तांबे यांनी केले आहे.
महाराष्ट्रात संगमनेरने राबवलेली ही संकल्पना अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. येथील कलावंतांची वादनातील ही कला देशभरात पोहोचली असून आज हिमाचल प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू यांसारख्या विविध राज्यांमध्ये संगमनेरचे कलाकार निमंत्रित केले जात आहेत. या सर्व कलाकारांना एकत्र आणून स्थानिक स्तरावर मोठा मंच उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. – सत्यजित तांबे, आमदार.






