Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

गणेशोत्सवाच्या काळातच संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात सायंकाळी ६ ते ९ या महत्त्वाच्या वेळेत नियमित वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या नियोजित लोडशेडिंगमुळे विद्यार्थी, महिला, व्यापारी आणि दुग्ध व्यावसायिकांचे मोठे हाल होत असून, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, अशी जोरदार मागणी संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी केली आहे.

सायंकाळची हीच वेळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची, महिलांच्या स्वयंपाकाची, व्यापाऱ्यांच्या व्यवसायाची आणि दुग्ध व्यावसायिकांच्या दूध संकलनाची असते. याच काळात वीज घालवून महावितरण ग्रामीण जनतेच्या अडचणी वाढवत असल्याचा आरोप शेलकर यांनी केला.

सरकारच्या २४ तास अखंड वीज देण्याच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करत, गणेशोत्सवातच गावात अंधार पसरत असेल तर महावितरण आणि प्रशासनाला ग्रामीण भागाचे काहीच देणेघेणे उरलेले नाही का, असा सवाल त्यांनी विचारला.

या समस्येची गंभीर दखल घेत महावितरणने फिडरनिहाय अधिकृत वेळापत्रक, लोडशेडिंगचे आदेश आणि त्यामागील खरी कारणे तातडीने जनतेसमोर जाहीर करावीत, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

गणेशोत्सवात आरती प्रकाशात व्हावी आणि सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुरळीत चालावे यासाठी पोकळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष वीजपुरवठा सुरू करण्याची गरज शेलकर यांनी व्यक्त केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply