महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर तालुक्यासह राज्यातील तीव्र दुष्काळी परिस्थिती, महावितरणकडून होणारा विजेचा खेळखंडोबा आणि डोळ्यांदेखत वाहून जाणारे हक्काचे पाणी या प्रश्नांवरून आज संपूर्ण संगमनेर तालुका रस्त्यावर उतरला. हजारो शेतकरी, नागरिक आणि महिलांच्या उपस्थितीत निघालेल्या अभूतपूर्व ‘जनआक्रोश मोर्चा’ने प्रशासकीय यंत्रणेला चांगलेच हादरवून सोडले. पूर्वकल्पना देऊनही निवेदन स्वीकारण्यासाठी प्रांताधिकारी उपस्थित न राहिल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाचा नाकर्तेपणा मोडून काढत थेट प्रांताधिकारी कार्यालयाचे गेट ओलांडून आत प्रवेश केला. आंदोलकांनी प्रांत अधिकारी कार्यालयात घुसत प्रांत अधिकाऱ्यांची खुर्ची देखील फेकून दिली. तसेच कार्यालयात नुकसान करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी संतप्त आंदोलकांना नुकसान करण्यापासून थांबविले. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आक्रमक शेतकऱ्यांना शांत करत प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवरच ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर प्रशासनाला आपली ताठर भूमिका सोडावी लागली आणि प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत निवेदन स्वीकारले.
संगमनेर तालुक्यातील जनतेच्या पाण्याचा आणि विजेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हजारो शेतकरी सकाळपासूच कडक उन्हात रस्त्यावर उतरले होते. या मोर्चाबाबत चार दिवसांपूर्वीच रीतसर पूर्वसूचना देऊनही प्रांताधिकारी अरुण उंडे राजकीय दबावापोटी गैरहजर राहिले. कडक उन्हात ताटकळत असलेल्या जनसमुदायाचा अंत पाहणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या उद्धट आणि निर्धावलेल्या वर्तनाविरोधात मोर्च्यातील शेतकरी व महिलांचा संताप अनावर झाला.
युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या या अनुपस्थितीवर तीव्र शब्दात जाब विचारला. अधिकाऱ्यांची मस्ती आणि प्रशासकीय अनास्था पाहून मोर्चातील तरुण व शेतकरी अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी थेट प्रांताधिकारी कार्यालयात घुसून जोरदार घोषणाबाजी केली.
या जनआक्रोश मोर्चामध्ये माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांच्यासह तालुक्यातील विविध शिखर संस्थांचे पदाधिकारी आणि हजारो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश पाहून बाळासाहेब थोरात यांनी तातडीने हस्तक्षेप करत सर्वांना शांततेचे आवाहन केले आणि सर्व नेत्यांसह प्रांत कार्यालयाच्या पायऱ्यांवरच ठिय्या मांडला. शेतकरी आणि नेते आपल्या मागण्यांवर ठाम असून मागे हटणार नाहीत हे स्पष्ट झाल्यावर हादरलेल्या प्रशासनाने धावपळ सुरू केली.
अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवनात दाखल झाले आणि त्यांनी मोर्चाच्या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारले. या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि महावितरणचे कार्यकारी अभियंता नारायण सोनवणे हे देखील उपस्थित होते.

आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – थोरातांचा घणाघात
प्रांताधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी आल्यानंतर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. प्रांताधिकारी हा तालुक्याचा प्रमुख असतो. हजारो शेतकरी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी कडक उन्हात ताटकळत असताना प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत आहे, ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. सध्याच्या लोकप्रतिनिधींनी शिव्या दिल्या तरी तुम्ही मुकाट्याने ऐकून घेता आणि त्यांचे फ्लेक्स लावत फिरता. आमदारांचे फ्लेक्स लावणे हे प्रांताधिकाऱ्यांचे काम नाही, तुम्ही त्यांचे गुलाम झाला आहात का, अशा अत्यंत कडक आणि खड्या शब्दांत थोरात यांनी प्रशासनाला सुनावले. त्यावर नियोजित कार्यक्रमामुळे उशीर झाल्याचा बचाव प्रांताधिकारी उंडे यांनी करण्याचा प्रयत्न केला; मात्र संतप्त नागरिकांनी प्रांत अधिकारी आणि प्रशासनाच्या विरोधात दिलेल्या जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर ढवळून निघाला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply