शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्च्यादरम्यान प्रांताधिकारी कार्यालयाच्या दालनात बळजबरीने प्रवेश करून गोंधळ घातल्याप्रकरणी विक्रम आत्माराम खांडरे (रा. कवठे कमळेश्वर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनियमित वीजपुरवठा, सक्तीचे भारनियमन, निळवंडे-भंडारदरा धरणातील पाण्याचा प्रश्न आणि दुष्काळी परिस्थिती यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संगमनेरात शेतकऱ्यांच्या महाआक्रोश मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.
मोर्चादरम्यान प्रांताधिकारी अरुण उंडे निवेदन घेण्यासाठी येत नसल्याचे दिसताच काही आंदोलक अचानक आक्रमक झाले. त्यांनी प्रवेशद्वार ओलांडत प्रांत अधिकारी कार्यालयाच्या आवारात गर्दी केली. यावेळी विक्रम खांडरे याने प्रांताधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार ओलांडून दालनात बळजबरीने प्रवेश केला. पोलीस फिर्यादीनुसार, त्याने दालनातील खुर्च्या व कागदपत्रांची फेकाफेक केली तसेच शासकीय कार्यालयातील महत्त्वाचे साहित्य व कागदपत्रांचे नुकसान केले.
सरकारी कामात अडथळा आणणे, शासकीय कार्यालयाची नासधूस करणे आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे या आरोपांखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान या संदर्भात संगमनेर-अकोलेचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.