श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग करत मोठ्या आवाजात डीजे वाजवून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी (२४ सप्टेंबर) संध्याकाळी कोकणगाव येथील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत हा प्रकार घडला. आरोपींमध्ये शिवम नंदकिशोर ढगे (अध्यक्ष, शिवबा प्रतिष्ठान कोकणगाव), हेमंत यशवंत धुमाळ (रा. सांबरवाडी, ता. फलटण, जि. सातारा), अजित अंबादास जोंगधडे (अध्यक्ष, शिवछत्रपती प्रतिष्ठान पानसरवाडी, कोकणगाव), अक्षय बाजीराव लोहकरे (रा. मांजर चांदोली, ता. आंबेगाव, जि. पुणे), जनार्दन लक्ष्मण पारधी (अध्यक्ष, उमाजी नाईक प्रतिष्ठान कोकणगाव) आणि आकाश विठ्ठल गुंजाळ (रा. बांडगाव, ता. संगमनेर) यांचा समावेश आहे.
या विसर्जन मिरवणुकीत सार्वजनिक ठिकाणी डीजेवर मोठ्या आवाजात गाणी वाजवून ध्वनीप्रदूषण करण्यात आले. बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी वेळोवेळी डीजेचा आवाज कमी करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करून सार्वजनिक शांततेचा भंग करण्यात आला आणि जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या आदेशाचे थेट उल्लंघन करण्यात आले.
याप्रकरणी पोलीस हवालदार राजेंद्र घोलप यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात बीएनएस कलम २२३, २७० आणि २९२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित महाजन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.