अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावरील विळद घाटातील ‘मातोश्री वृद्धाश्रमा’त आज, शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास एका वृद्धाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात सुरक्षारक्षकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले.
शारीरिक व्यंगावरून वृद्धाश्रमातील इतर रहिवाशांनी केलेली चेष्टामस्करी सहन न झाल्याने संतप्त झालेल्या एका वृद्धाने झोपेत असलेल्यांवरच लोखंडी रॉडने भीषण हल्ला चढवला. या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली असून एमआयडीसी पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या हल्लेखोराला तात्काळ अटक केली आहे.
महंकलेश्वर बाबुराव हेने (वय ५८, रा. भिंगार) आणि दत्तात्रय शंकर हरके (वय ८०, रा. जामखेड) अशी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर गोरक्ष हरिभाऊ फुंदे, गणेश छबु घोडके, बाबासाहेब अंबादास धाडगे, लिंबराज दामोदर फीसके आणि साहेबराव दगडू भवर यांच्यासह सहा जण या घटनेत जखमी झाले आहेत.
सर्व जखमींवर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून एका जखमीची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी हल्लेखोर राजू तुकाराम घुले (वय ५४, रा. कोपरगाव) याला मनमाड रस्त्यावरून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर राजू घुले हा नोव्हेंबर २०२५ पासून मातोश्री वृद्धाश्रमात राहत होता. त्याचा उजवा हात थरथर कापत असल्याने आश्रमातील काही वृद्ध त्याच्या हाताची नक्कल करून त्याची चेष्टा करत असत. याच रागातून शनिवारी सकाळी ६.१५ च्या सुमारास बहुतांश वृद्ध झोपेत असताना अथवा आवरत असताना राजूने चालण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी रॉडने अचानक सर्वांवर प्रहार करण्यास सुरुवात केली.
त्याने प्रथम सुरक्षारक्षक महंकलेश्वर हेने यांच्यावर आणि नंतर दत्तात्रय हरके यांच्या डोक्यावर वार केले. आश्रमातील साहेबराव भवर हे घाबरून कॉटखाली लपले असता हल्लेखोराने कॉट बाजूला सरकवून त्यांच्यावरही डोक्यात वार केले.
अचानक झालेल्या या भयंकर हल्ल्यामुळे वृद्धाश्रमात आरडाओरड आणि किंकाळ्यांचा आक्रोश पसरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वृद्धांच्या बचावासाठी काही जणांनी तातडीने जवळच्या पेट्रोल पंपावर धाव घेऊन तेथील कर्मचाऱ्यांना माहिती दिली. एका वृद्ध महिलेने फोन करून व्यवस्थापक दिलीप चोरडिया यांना घटनेची कल्पना दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक हेमंत थोरात आणि पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सध्या वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक दिलीप चोरडिया यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.