अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
“राजकारणात सूडबुद्धी आणि स्वार्थ हाच अंतिम शब्द नसून, तिथे संवेदनशीलतेचा आणि महाविकास आघाडीच्या धर्माचा अनोखा अध्यायही जपला जाऊ शकतो, याचा प्रत्यय संगमनेरमधील एका भावूक प्रसंगाने दिला आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते भाऊसाहेब हासे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय औदार्याचा व संवेदनशीलतेचा आलेला वैयक्तिक अनुभव समाज माध्यमावर मांडत थोरात साहेबांना ‘देव माणूस’ असे संबोधले आहे. राजकीय वैर बाजूला सारून एका सामान्य कार्यकर्त्यासाठी न्यायालयात जाऊन साक्ष देण्यापासून ते वैयक्तिक दुःखात पाठीशी उभे राहण्यापर्यंत बाळासाहेब थोरात यांनी जपलेली माणूसकी आणि महाविकास आघाडीचा धर्म आज तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे.”
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख राहिलेले भाऊसाहेब हासे यांनी समाज माध्यमांमध्ये केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. हासे यांनी यात नेमके काय म्हटले आहे, ती पोस्ट महाराष्ट्र संवाद न्यूजच्या वाचकांसाठी देत आहोत.
मी अनुभवलेला देव माणूस – बाळासाहेब थोरात साहेब
“राजकारण लय वंगाळ असतं असं स्वर्गीय अजितदादा पवार म्हणाले होते; परंतु राजकारणात माननीय बाळासाहेब थोरात यांच्यासारंखे देव माणूस असतात, हे मला लेट कळालं…”
शिवसैनिकांचे दैवत शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनंतर शिवसैनिकांना ऊर्जा निर्माण करण्याचे काम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी केली. आमच्या महाराष्ट्राच्या नव्हे तर देशभरातल्या शिवसैनिकांच्या काळजात त्यांचे स्थान पूजनीय आहे.
अकरा वर्षापूर्वीचे दिवस आठवले तर शिवसेना-कॉग्रेस म्हणजे विळा-भोपळ्याचे वैर. दोन्ही पक्ष कट्टर विरोधक; पण राजकारणात कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, हे २०१९ मध्ये सिद्ध झाले. शिवसेना-भाजप युती तुटली आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा उदय झाला. या आघाडीचे शिल्पकार आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, कॉग्रेसकडून आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आणि राष्ट्रवादी कॉग्रेसकडून आदरणीय शरद पवार साहेब होते. वरिष्ठ पातळीवर आघाडी झाली. आघाडीमध्ये आम्ही तळागाळातील कार्यकर्त्यानी सर्व जुने हेवेदावे बाजूला ठेवून आघाडी बळकट करण्यासाठी जीवाचे रान केले.
पारंपरिक शिवसेना-कॉग्रेस वैरामुळे एकमेकांवर छोट्या-मोठ्या आंदोलनांच्या केसेस आम्हा कार्यकर्त्यावर होत्या. तसेच, मी एक सामान्य शिवसैनिक असताना तत्कालीन महसूल मंत्री असलेल्या आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्यावर शाईफेकीचा गुन्हा दाखल झालेला. इतर आंदोलनांचेही गुन्हे दाखल झाले होते. कालांतराने माझ्यावरील सर्व गुन्हे निकाली निघाले.
त्याचदरम्यान काही काळ आधी खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना सोडून कॉग्रेसमध्ये गेले असताना त्यांनी माझ्यावर हाणामारीची खोटी केस दाखल केली होती. ते पुन्हा शिवसेनेत आल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यावर केस नको म्हणून ती केस काढण्याचा आदेश दिला. साहेबांनी केस काढण्यासाठी प्रयत्न केले आणि नंतर ती केस निकाली निघाली. त्यामागे खासदार साहेबांचा शंभर टक्के स्वार्थ होता, कारण त्यांना पुन्हा शिवसेनेची खासदारकी मिळालेली होती.
माझ्या आयुष्यात कलाटणी आणणारा प्रसंग…
महाविकास आघाडी झाली असताना एका शिवसैनिकावर आघाडीतील व्यक्तीकडून केस आहे, ही गोष्ट थोरात साहेबांच्या मनाला पटली नाही. त्यांनी लगेच मला निरोप पाठवला. राज्यांचे महसूल मंत्री असूनही एका सामान्य कार्यकर्त्यासाठी त्या केस मधून निर्दोष मुक्तता व्हावी, यासाठी त्यांनी स्वतःचा अनमोल वेळ काढून न्यायालयात हजर राहून माझ्या बाजूने साक्ष दिली. एवढेच नाही, तर केसमधून पूर्ण निर्दोष मुक्तता होईपर्यत वेळोवेळी फोन करून माझी विचारपूस केली.
दीड वर्षापूर्वी माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. माझ्या पत्नीचे कॅन्सरने निधन झाले. अशा कठीण प्रसंगी कोणताही राजकीय आकस न ठेवता थोरात साहेब कोणताही संकोच न करता थेट माझ्या घरी सांत्वन भेटीसाठी आले. याउलट, आम्ही उद्धव साहेबांच्या आदेशाने सर्व वैर विसरून मनापासून खासदार साहेबांचा प्रचार केला, तरीही त्यांनी जुना राग मनात ठेवून माझ्या दुःखात साधी भेटही टाळली. इथेच स्पष्ट होते. एक राजा माणूस आणि एक स्वार्थी राजकारणी.
वरच्या लेखनापासून ते तळागाळापर्यत महाविकास आघाडीचा धर्म शेवटपर्यत पाळणारा नेता म्हणजे आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब. मी अनुभवलेला हा छोटासा परंतु सर्वात मोठा अनुभव माझ्यासाठी मन परिवर्तनांची शिकवण देणारी घटना ठरली.
संगमनेरच्या जनतेला लाभलेला हा कोहिनूर हिरा आहेच; परंतु चालता-बोलता सह्याद्री पर्वत आहे. तालुक्यावर येणारा प्रत्येक भार आपल्या खांद्यावर घेऊन जनतेला सुखी ठेवणारे हे व्यक्तिमत्त्व आहे.
मात्र आज एकच खंत मनात आहे की, मी महाविकास आघाडीचा असूनही माझं मत मी थोरात साहेबांना देऊ शकलो नाही. मला थोरात साहेबांसारखा देव माणूस ओळखायला जीवनातील वीस वर्षे लागली साहेब. मला माफ करा. माझ्याकडून फार मोठी चूक झाली. या चुकीची प्रायश्चित्ते मी माझ्या पुढील संपूर्ण आयुष्यात नक्की करेन. आपणही या देव माणसाला संगमनेरच्या समुद्धीसाठी जिवाभावे जपले पाहिजे.
“एक राजा माणूस… जनतेचा खरा आधार…”

https://www.facebook.com/share/19m3iT71nP/

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply