महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- उडीसा आणि आसाम या राज्यांतून पुण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी होत असल्याचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे. संगमनेर तालुक्यातील सायखिंडी फाटा येथे सोमवारी सकाळी रचलेल्या सापळ्यात तब्बल १५२ किलो ६१ ग्रॅम वजनाचा उच्च दर्जाचा गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईत वाहनासह एकूण ८८ लाख ७७ हजार ४७० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून दोन तस्करांना रंगेहात अटक केली आहे. तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांसह तीन साथीदार अद्याप फरार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव व त्यांचे पथक भागात गस्त घालत असताना, पांढऱ्या रंगाच्या नेक्सॉन कारमधून गांजाची मोठी वाहतूक होत असल्याची गुप्त बातमी मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सायखिंडी फाटा परिसरात तातडीने सापळा रचला. सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास एमएच १२ युएफ ९११३ क्रमांकाची संशयित कार येताच पोलिसांनी ती चारीबाजूंनी अडवली. सुरवातीला कारमधील संशयितांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा आणि उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कारची कसून झडती घेतली असता, आतमध्ये प्लॅस्टिकच्या अकरा सीलबंद गोण्या आढळून आल्या. पंचांसमक्ष गोण्या उघडून पाहिल्यावर त्यातून गांजा या वनस्पतीचे शेंडे, पाने आणि बिया असलेला उग्र वासाचा उच्च प्रतीचा गांजा मिळून आला. तस्करांनी पोलिसांचा डोळा चुकवण्यासाठी गाडीवर बनावट नंबर प्लेट (ओडी ०८ एक्स ४३८५) लावून प्रवास सुरू ठेवला होता. कारवाईत ताब्यात घेतलेले आरोपी दत्तात्रय नानाभाऊ इचके (वय रा. कवठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे) आणि श्रीहरी बाळू मिडगुले (रा. कान्हूर यमाई, ता. शिरूर, जि. पुणे) यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी हा मुद्देमाल आसाम येथून कुंग्फू नामक व्यक्तीकडून आणल्याची कबुली दिली. हा साठा साहेबराव उर्फ भाऊसाहेब बाळू मिडगुले (रा. कान्हूर यमाई) आणि विशाल उर्फ दादा साळुंके (रा. पुणे) यांच्याकडे सुपूर्द केला जाणार होता आणि तेथून संपूर्ण पुणे जिल्ह्यात त्याचे जाळे पसरवून विक्री केली जाणार होती, असा खुलासा तपासात झाला आहे. लाखांचा मुद्देमाल जप्त, फरार आरोपींचा शोध सुरू या धडक कारवाईत पोलिसांनी गांज्यासह नेक्सॉन कार, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ८८ लाख ७७ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फरार आरोपी कुंग्फू, साहेबराव मिडगुले आणि विशाल साळुंके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, अंमलदार विजय पवार, रिचर्ड गायकवाड, विकास साळवे, राहुल डोके, भीमराज खरसे, भगवान थोरात, सुनील मालनकर आणि महादेव भांड यांच्या पथकाने पार पाडली.