महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
दुष्काळाच्या तीव्र संकटामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च पालकांसाठी मोठे आव्हान ठरत असल्याने दुष्काळग्रस्त भागातील शालेय, कनिष्ठ महाविद्यालयीन तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मासिक एस.टी. बस पासचे शुल्क शंभर टक्के माफ करावे, अशी आग्रही मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी मुंबई येथे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे ही मागणी केली. यात खताळ यांनी म्हटले आहे की, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी दररोज आपल्या गावातून तालुका, शहर अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी एस.टी. बसने प्रवास करावा लागतो. गावांमध्ये शैक्षणिक सुविधा मर्यादित असल्याने प्रवासासाठी एस.टी. हाच सुरक्षित, नियमित आणि एकमेव परवडणारा पर्याय आहे.
मात्र सध्याच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत प्रवासाचा खर्च कमी झाल्यास कुटुंबांना मोठा आधार मिळू शकतो. आर्थिक अडचणींमुळे एकाही विद्यार्थ्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये, यासाठी शासनाने तातडीने शासन निर्णय जारी करून संबंधित विभागीय नियंत्रक व आगार व्यवस्थापकांना याबाबत स्पष्ट निर्देश द्यावेत.
संगमनेर आगाराला २५ इलेक्ट्रिक बस मंजूर; पहिली तुकडी गुरुवारी दाखल होणार-
आमदार खताळ यांनी संगमनेर आगारासाठी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. त्यांनी मागील आठवड्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे संगमनेर आगारासाठी नव्या इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत परिवहन मंत्र्यांनी संगमनेर आगारासाठी २५ इलेक्ट्रिक ‘शिवाई’ एस.टी. बस मंजूर केल्या आहेत. त्यापैकी १० नवीन इलेक्ट्रिक बस गुरुवारी संगमनेर आगारात दाखल होणार असून यामुळे स्थानिक प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply