महात्मा गांधी हे खऱ्या अर्थाने देश व समाज समजलेले नेते होते. त्यांनी अखंड जीवनभर भारतीय परंपरा आणि धर्माचा अभिमान बाळगला, मात्र त्यांचा धर्म हा माणूसपणापासून दूर गेलेला किंवा द्वेष व मत्सराने भरलेला नव्हता, असे प्रतिपादन राज्य अभ्यासक्रम पुनर्रचना समितीचे सदस्य व ज्येष्ठ पत्रकार संदीप वाकचौरे यांनी केले.
सबनीस शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक वाल्मीकराव चौधरी हे होते, तर व्यासपीठावर प्राचार्य डॉ. बाळासाहेब मुरादे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वाकचौरे पुढे म्हणाले की, महात्मा गांधींनी आयुष्यभर उत्तम माणूस होण्याचा प्रयत्न केला आणि विचारांच्या पलीकडे जाऊन ते आचरणात आणण्यावर भर दिला. स्वतःच्या चुका आत्मचरित्रात मांडण्याचे मोठे धाडस त्यांनी दाखवले, म्हणूनच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीत सामान्य माणूस केंद्रस्थानी होता. सर्व माणसे ईश्वराची लेकरे आहेत ही त्यांची धारणा होती.
गांधी हा कोणताही वाद नसून तो समाजातील चांगुलपणाचा विचार आहे. आज समाजमाध्यमांवर गांधींवर होणारी टीका ही आपलीच गांधींना समजून घेण्यातील अपुरेपणा दर्शवते, ज्यामुळे गांधींचे नव्हे तर समाजाचेच अधिक नुकसान होत आहे, असा खेदही त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात वाल्मीकराव चौधरी यांनी स्पष्ट केले की, गांधीजींनी दाखवलेला प्रामाणिकपणाचा मार्ग हाच जीवन उन्नतीचा खरा मार्ग आहे. या मार्गाने गेल्यास जीवनात समाधान आणि आनंद नक्कीच मिळतो.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब मुरादे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी प्रा. डॉ. सुनिता पाटोळे, प्रा. शरद तरटे, प्रा. वैभव खराडे, ग्रंथपाल सय्यद तनवीर, मुख्य लिपिक रेश्मा मेहेर व अरविंद बेनके उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृषाली वसंत काकडे यांनी केले, सूत्रसंचलन इरम पटेल यांनी केले तर शेवटी सुधीर डोके यांनी उपस्थितांचे आभार मानले.