महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
खरी शिवसेना कोणाची यावरुन न्यायालयात वाद विवाद सुरु असतांना दसरा मेळाव्यासाठीही शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला न्यायालयात जावे लागले. न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवाजी पार्कवर ठाकरेंच्याच शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतांना बीकेसीत शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा होत आहे.
मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी दसरा मेळाव्याला गर्दी जमविण्यासाठी चालविलेल्या कोट्यावधी रुपयांच्या उधळपट्टीची ईडी आणि आयकर विभागाने चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
लोंढे म्हणाले, शिंदे गट राज्याच्या विविध भागातून एसटी व खासगी बसेसमधून कार्यकर्ते आणत आहे. यासाठी एसटी महामंडळाकडे दहा कोटी रुपये भरले असून ते मोजण्यासाठी महामंडळाला दोन दिवस लागले, असे वृत्त माध्यमातुन समजले. शिंदे गटाकडे एवढी मोठी रक्कम आली कोठून? हा पैसा त्यांना कोणी दिला? एवढ्या मोठ्या रकमेचा रोख व्यवहार करता येतो का? ही मनी लाँडरींग नाही का? मेळाव्यासाठी झालेल्या संपूर्ण खर्चाची ईडी व आयकर विभागाकडून चौकशी केली जावी.
मेळावा यशस्वी करण्यासाठी व शक्ती प्रदर्शनासाठी शेकडो बसेसच्या माध्यमातून राज्यभरातून लोक आणले जात आहे. त्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. शिंदे यांच्या गटाची अद्याप नोंदणी झालेली नाही, मग मेळाव्यासाठी खर्च होणारा एवढा पैसा त्यांच्याकडे कोणत्या खात्यातून आला. हा मनी लाँडरींगचा प्रकार नाही का असादेखील सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

