महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
केंद्रीय निवडणूक आयोगाचा रात्री मोठा निर्णय समोर आला आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे यांच्या गटाच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. ठाकरे गटाचे नाव यापुढे ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे असेल. त्यांच्या गटाला ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव मिळाले असून चिन्हासाठी त्यांच्याकडून पुन्हा पर्याय मागविण्यात आला आहे.
शिवसेना फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठविले होते तसेच शिवसेना हे नाव वापरण्यास दोन्ही गटाला परवानगी नाकारली होती त्यामुळे आयोगाने दोन्ही गटाकडून नाव आणि चिन्हाबाबत पर्याय मागविले होते सोमवारी आयोगाने या पर्यायांवर निर्णय घेतला उद्धव ठाकरे यांनी मशाल या सोबतच त्रिशूल आणि उगवता सूर्य हे चिन्हाचे ऑप्शन दिले होते. यावर आयोगाने त्यांना मशाल हे चिन्ह दिले आहे. ठाकरे यांच्या नव्या पक्षाचे नाव यापुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे असेल.
तर शिंदे गटाकडून देखील त्रिशूल, उगवता सूर्य व गदा हे ऑप्शन देण्यात आले होते. मात्र त्रिशूल व उगवता सूर्य ही चिन्हे निवडणूक आयोगाच्या यादीत नसल्याने तर गदा हे चिन्ह धार्मिकतेशी संबंधित असल्याने शिंदे गटाकडून पुन्हा नव्याने चिन्हांचे पर्याय आयोगाने मागविले आहेत. शिंदे गटाच्या पक्षाचे नाव यापुढे बाळासाहेबांची शिवसेना असे असणार आहे. शिंदे गटाच्या पक्षाला आता नवीन कोणते चिन्ह मिळते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना नावावर आयोगाचे शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला मशाल चिन्ह तर शिंदे गटाकडून पर्याय मागविला

