महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
ठाकरे आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला वेगवेगळ्या नावाने मान्यता मिळाल्यानंतर आता चिन्ह देखील निश्चित झाले आहे. शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला ‘मशाल’ तर त्या पाठोपाठ मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला अखेर ‘ढाल तलवार’ हे चिन्ह मिळाले आहे.
त्यामुळे येत्या काळात मुख्यमंत्र्यांचे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या ‘मशाली’ला ‘ढाल तलवारी’ने प्रत्युत्तर देणार आहे.
सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशा नावाने मान्यता देत त्यांना ‘मशाल’ हे चिन्ह दिले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव मिळाले होते.
शिंदे गटाने दिलेले चिन्हाचे पर्याय आयोगाकडून नाकारण्यात आल्यानंतर त्यांना आज नव्याने चिन्हासंबंधी पर्याय देण्याचे सुचविण्यात आले होते. शिंदे गटाने आयोगाला दिलेल्या पर्यायातून ‘ढाल तलवार’ हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने निश्चित केले आहे.
ढाल तलवार हे नवे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, ढालीने जनतेचे रक्षण करायचं आणि दुश्मन अंगावर आला तर तलवार उगारायची. शिंदे गटाला मिळालेले ढाल तलवार हे चिन्ह परफेक्ट आहे.


