महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेच्या आणखी एक मानाचा तुरा रोवणारा राष्ट्रीय पातळीवरचा ऊस विकास पुरस्कार पुण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, व्हीएसआयचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते थोरात कारखान्यास प्रदान करण्यात आला.
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारी साखर कारखान्यांसाठी संगमनेरचा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना मापदंड ठरला आहे. कारखाना आतापर्यंत अनेकदा राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पुरस्काराने गौरविला गेला आहे.
मांजरी (पुणे) येथे झालेल्या वसंतदादा शुगर इन्सि्टट्युटच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नॅशनल फेडरेशन ऑफ को ओपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड यांच्यावतीने देण्यात येणारा राष्ट्रीय पातळीवरचा ऊस विकासाचा हा पुरस्कार कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते नामदार अजित पवार, आमदार जयंत पाटील, व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब पाटील, विश्वजीत कदम, जयप्रकाश दांडेगावकर, प्रकाश नाईकनवरे, व्हीएसआयचे संभाजी कडू आदि उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा सहकार हा आदर्शवत पॅटर्न म्हणून राज्यात व देशात दिशादर्शक ठरत आहे. या पुरस्काराद्वारे येथील सहकार मॉडेलचा पुन्हा एकदा राज्यपातळीवर गौरव झाला आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर आर्थिक शिस्त, नियोजन व दुरदृष्टी ठेवून गुणवत्तापुर्वक राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे या कारखान्याला आत्तापर्यंत राज्य व देशपातळीवर अनेकवेळा गौरविण्यात आले आहे. सहकाराची पंढरी ठरलेल्या संगमनेरच्या शिरपेचात कारखान्याला मिळालेल्या या पुरस्काराने मानाचा तुरा रोवला आहे.
कारखान्याने मागील अनेक वर्षे ऑडिटचा ‘अ’ दर्जा राखून सातत्याने सामाजिक उपक्रमांत सहभाग नोंदविला आहे. उपक्रमशिलता कायम ठेवून जलसंधारण व तालुक्याचे हदय म्हणून काम करतांना कमी पाऊस असूनही या कारखान्याने सातत्याने सभासद, कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचा मोठा विश्वास संपादन केला असून मागील हंगामात १५ लाख ५१ हजार मेट्रिक टनाचे उच्चांकी गाळप करून विक्रमी भाव दिला आहे. तसेच सतत ऊस विकाससासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहे.
कारखान्याच्या या यशाबद्दल माजी महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, सत्यजीत तांबे, रणजितसिंह देशमुख, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात आदींसह सभासद, ऊस उत्पादक व शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाचे आभिनंदन केले आहे.

