अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये मानवी तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलिसांनी यातील रॅकेट उघड करत चौघा जणांना ताब्यात घेतलं असून चार जणांची सुटका केली आहे.
मानवी तस्करी करणाऱ्या टोळीने लोकांना डांबून ठेवत, त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडून वेठबिगारी तसेच भीक मागून घेतली जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पिलाजी भोसले, अमोल भोसले, अशोक भोसले आणि गंजा काळे अशी बेलवंडी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे असून आणखी दोघा आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
परराज्यातील मनोरुग्ण किंवा भोळसट लोकांना महाराष्ट्रामध्ये पाच-पाच हजार रुपयात विकले गेले असल्याचे समोर आले असून आरोपींनी मानसिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणून त्यांच्याकडून शेतीची कामे करून घेतली जात असल्याचे तसेच काही ठिकाणी रेल्वे स्थानकावर अशा लोकांना भीक मागावयास लावले जात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची तीन पथके तयार करून ही कारवाई केली. आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी सलमान उर्फ करणकुमार, आत्मज नेहरू (छत्तीसगढ), ललन सोपाल (बिहार), भाऊ मोरे (बीड) श्री शिव (कर्नाटक) यांची सुटका केली आहे. दरम्यान पोलीस तपासात आणखी माहिती पुढे येण्याची शक्यता असून पोलिसांनी देखील नागरिकांना या संदर्भात माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
