संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
संगमनेरात दुचाकीचोरांनी आपले टार्गेट बदलले असून आता जुन्या दुचाकी ऐवजी नव्या दुचाकीकडे लक्ष वळविले आहे. दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास दुचाकीचोरांनी कोल्हार-घोटी मार्गावरील गांधी मोटर्स टीव्हीएस शोरूमचे पत्र्याचे गोडाऊन फोडत पावणेतीन लाख रुपये किमतीच्या तीन दुचाकी चोरून नेल्या आहे.
अधिकारी बदलूनही नव्या अधिकाऱ्यांना शहरात कायद्याचा धाक निर्माण करण्यात यश येताना दिसत नाही. दररोज सुरू असलेल्या चोऱ्यांमुळे संगमनेरकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांवर नियंत्रण आणण्यास अपयशी ठरलेल्या पोलीस यंत्रणेमुळे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारांच्या माहितीचा अभाव असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे चोरट्यांचे फावले आहे. तक्रार देण्यास गेलेल्या तक्रारदाराचीच पोलीस यंत्रणा उलट तपासणी घेऊ लागल्याने नागरिकांना देखील पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची भीती वाटू लागली आहे.
कोल्हार-घोटी मार्गावर गांधी मोटर्स टीव्हीएस दुचाकीचे शोरूम आहे. गुरुवारी (ता. ११ मे) सायंकाळी शोरूम नेहमीप्रमाणे बंद केल्यानंतर पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शोरूमच्या पत्र्याच्या गोडाऊनचा पत्र उचकटून काढत आत मध्ये प्रवेश मिळविला. शोरूमच्या गोडाऊनमधून चोरट्यांनी टीव्हीएस कंपनीच्या २ लाख ६४ हजार ४८५ रुपये किमतीच्या तीन नवीन दुचाकींची चोरी केली. नव्या कोऱ्या दुचाकी घेऊन चोरटे पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर शोरूमचे व्यवस्थापक विजय सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार नोंदविली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
बस स्थानक परिसर चोरट्यांसाठी ‘हॉटस्पॉट’ झाला असून बस स्थानकातून महिलांच्या दागिन्यांच्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या सुरू आहे. एकीकडे चोरट्यानी बस स्थानकाला टार्गेट केले असतानाच दुसरीकडे शहरात देखील उच्छाद मांडला आहे. काही वर्षांपूर्वी बस स्थानक अथवा शहराच्या एखाद्या भागात किरकोळदेखील चोरी झाली तरी देखील पोलीस यंत्रणा काही वेळातच चोरांना पकडत असे. आता शहराच्या विविध भागात चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांची माहिती नसलेल्या(?) पोलिसांच्या हातात कारभार गेल्याने पोलीस यंत्रणा चोरांवर नियंत्रण मिळवू शकत नसल्याची देखील चर्चा रंगली आहे.

