आश्वी (महाराष्ट्र संवाद न्यूज)
संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कोल्हार-घोटी महामार्गावरील लगतच्या दोन गावांमधून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञातांनी पळून नेल्याचा प्रकार घडला. या संदर्भात दोन्ही मुलींच्या पालकांनी आश्वी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पहिल्या घटनेत 16 मे रोजी 14 वर्षे 10 महिने वयाची अल्पवयीन मुलगी गावातील दुकानामध्ये मॅगी आणण्यासाठी गेली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी परतली नाही. त्यामुळे घरातील व्यक्तींनी दुकानदाराकडे जाऊन चौकशी केली असता संबंधित मुलगी दुकानात मॅगी घेण्यासाठी आली नसल्याची माहिती त्यांना मिळाली. आजूबाजूला तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही, त्यामुळे तिच्या घरच्या व्यक्तींनी दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत तिला फुस लावून कोणीतरी पळवून नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.
तर दुसऱ्या घटनेमध्ये दोन वर्षापासून शाळा सोडून घरी असलेली सतरा वर्षे वयाची मुलगी घरात कोणाला काही न सांगता 17 मे रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घरातून दहा हजार रुपयांची रोकड आणि आधार कार्ड सोबत घेऊन निघून गेली आहे.
अज्ञात व्यक्तीने तिला कशाचे तरी अमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याची तक्रार पालकांनी आश्वी पोलीस ठाण्यात दिल्याने लागोपाठ दोन दिवस घडलेल्या या दोन्ही घटनांमध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आश्वी पोलीस पुढील तपास करत आहे.

