महाराष्ट्र संवाद न्यूज
पंढरपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नव्याने राज्यात पसरू पाहणाऱ्या बीआरएस (BRS) पक्षाची वाट धरली आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांनी पक्षप्रवेशाचा मुहूर्त निवडला आहे.
भालकेंच्या बीआरएस प्रवेशामुळे या भागात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पंढरपूर येथील कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर भालके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २७ जून रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला येणार आहेत.
यावेळी सकाळी सरकोली (ता. पंढरपूर) येथे शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात भालके त्यांच्या कार्यकर्त्यांसह बीआरएसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करतील.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भगीरथ भालके राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. मात्र, त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, आता भालके २०२४ मध्ये भारत राष्ट्र समिती या पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
स्व. भारत भालकेंच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाने त्यांना अपेक्षित सहकार्य केले नाही. आर्थिक अडचणीत असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना बाहेर काढण्यासाठी भालके पक्ष नेतृत्वाकडे वारंवार गेले होते मात्र पक्ष नेतृत्वाकडून त्यांची फारशी दखल घेतली नसल्याची खंत भालके यांनी व्यक्त केली होती.
त्यामुळे मागील काही दिवसांपासून भगीरथ भालके हे बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. या चर्चेवर आता शिक्कामोर्तब झाले असल्याने भालके यांच्या निर्णयाचे पंढरपूर व मंगळवेढा येथील कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैदराबादला गेले होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात ही भेट झाली होती. या भेटीची दखल घेत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यांना निर्णयाची घाई नको म्हणून सल्ला देण्यात आला होता.

