महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि तीन सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या अपात्रतेच्या निर्णयाला नाशिकच्या अप्पर विभागीय आयुक्तांनी मंगळवारी (दि. २ जून) तात्पुरती स्थगिती दिली आहे. या स्थगिती आदेशानंतर सरपंच निर्मला राऊत यांच्यासह इतर सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या नियमित कामकाजाला पुन्हा सुरुवात केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ९ जुलै रोजी होणार आहे.

घुलेवाडी ग्रामपंचायतीवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे. येथील लोकनियुक्त सरपंच निर्मला राऊत, तसेच सदस्य दत्तात्रय राऊत, सोनाली गिरी आणि अनिल राऊत यांनी गावातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्याचा वैयक्तिक लाभ उठवला, अशी तक्रार शिवसेना शाखाप्रमुख शरद पानसरे यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली होती.
या तक्रारीची चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली होती. चौकशीअंती, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींनुसार कारवाई करत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ११ मे रोजी या चारही लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय दिला होता.
जिल्हाधिकार्यांच्या या निर्णयाला आव्हान देत सरपंच व सदस्यांनी नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. या अपीलवर झालेल्या सुनावणी दरम्यान विरोधी पक्षाचे (सामनेवाले) वकील उपस्थित न राहिल्याने त्यांनी पुढील तारीख देण्याची विनंती केली. परिस्थितीचा विचार करून विभागीय आयुक्तांनी २ जून रोजी जिल्हाधिकार्यांच्या अपात्रतेच्या आदेशाला स्थगिती दिली.

घुलेवाडी ही मोठी लोकसंख्या असलेली आणि तालुक्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील ग्रामपंचायत मानली जाते. सध्या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून, एका मोठ्या पाणी योजनेचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच व सदस्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. तालुक्यातील नवीन लोकप्रतिनिधींनी या पाणी योजनेच्या कामाला गती देण्याऐवजी, त्यांच्या स्थानिक समर्थकांकरवी विकासकामांमध्ये सातत्याने राजकीय अडथळे आणल्याचा दावा घुलेवाडीच्या सत्ताधार्यांनी केला आहे.
आयुक्तांनी दिलेली स्थगिती म्हणजे लोकशाहीचा आणि आमच्या कायदेशीर लढ्याचा विजय आहे. घुलेवाडीच्या जनतेने आमच्यावर ठेवलेला विश्वास आम्ही वाया जाऊ देणार नाही. गावात पिण्याच्या पाण्यासह इतर विकासकामांना गती देणे आणि जनतेच्या हितासाठी काम करणे हेच आमचे मुख्य ध्येय राहील.– निर्मला राऊत (सरपंच, घुलेवाडी)


