महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी कोणताही गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला नसताना केवळ राजकीय द्वेषातून त्यांची खासदारकी रद्द करून त्यांना बेघर करण्यात आले. गांधी यांच्यावरील अन्यायाविरोधात आज आम्ही एक दिवसाचे मौन सत्याग्रह आंदोलन केले. आंदोलन संपले असून आता भ्रष्ट भाजपचा राज्यभर भांडाफोड करून त्यांना सळो की पळो करून सोडणार असल्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
जनतेची भावना संसदेत मांडणाऱ्या निरपराध राहुल गांधी यांच्यावर लावण्यात आलेल्या खोट्या आरोपांमागे भाजपचा हात असल्याचा आरोप पटोले यांनी बुधवारी केला. मंत्रालयाजवळ महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसच्या वतीने मौन सत्याग्रह करण्यात आला. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना पटोले यांनी भाजपवर टीका केली.
पटोले म्हणाले, मौन सत्याग्रहाच्या माध्यमातून महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारला नामोहरण करून सोडले होते. आम्ही देखील आज याच मौन सत्याग्रहाच्या अस्त्राचा वापर भाजपच्या सरकार विरोधात केला आहे. भाजपच्या भ्रष्ट, अत्याचारी, हुकूमशाही सरकार विरोधात हा लढा सुरू असून मुंबईसह महाराष्ट्रभर तो तीव्र करून भाजपचा भांडाफोड करू.
संसदेत जनतेचे प्रश्न मांडत असताना राहुल गांधी यांनी आदानी आणि मोदी संबंधाबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर मोदी सरकार घाबरले आणि आपले पितळ उघडे पडणार या भितीतून त्यांनी गांधी यांच्यावर खोटी कारवाई केली आहे. देशातील जनता हे सर्व बघत असून गांधींना शिक्षा करणाऱ्या भाजप विरोधात वनवा पेटला असून यात भाजपचे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही.

