महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – अजितदादांचे मंत्री आणि शरद पवारांच्या भेटीत आज नेमकी काय चर्चा झाली? याबाबत जयंत पाटलांनी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, हे सर्वजण पवार साहेबांना भेटण्यासाठी आले होते. ते अनपेक्षितपणे आले. पवार साहेबांनी त्यांचे सर्व म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेतले आहे.
अजित दादांचा नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या या गटाचे म्हणणे आहे की, आपण एकसंध राहू. चूक झाली आहे. आपणच यातून काय तो मार्ग काढावा. यावर पवार साहेबांनी त्यांना कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. आम्ही यावर चर्चा करून निर्णय घेऊ असे पाटील म्हणाले.
राज्य विधीमंडळ अधिवेशन उद्यापासून सुरू होत असतानाच राज्यात काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सर्व मंत्री आणि महत्त्वाच्या नेत्यांनी आज अनपेक्षितपणे शरद पवार यांची भेट घेतली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील, धर्मराव बाबा अत्राम, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांच्यासह सर्वच मोठ्या नेत्यांचा पवारांना भेटलेल्यात समावेश होता.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच या सर्वांनी पवार यांची रविवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली.

