महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – बस स्थानकामध्ये एसटी बसच्या चाकाखाली सापडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आयेशा मुनीर बेग (वय 55 वर्ष, रा. संगमनेर खुर्द, ता. संगमनेर) असे अपघातात मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.
गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास संगमनेर बस स्थानकामध्ये सिन्नर आगाराची नासिक-अहमदनगर (क्रमांक एम.एच 20 बीएल 4056) ही बस आली होती. या बसच्या चाकाखाली सापडून या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
आयेशा बेग संगमनेर बस स्थानकावर आपल्या नातेवाईकांसह आल्या होत्या. बस चालक बस स्थानकामध्ये आपल्या ताब्यातील बस स्थानकाबाहेर नेण्याच्या बेतात असताना अचानकपणे त्या बसच्या चाकाखाली सापडल्या. गंभीर जखमी झालेल्या बेग यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान झालेल्या प्रकाराची माहिती मिळतच संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. उपचारापूर्वीच बेग यांचा मृत्यू झाल्याचे निदान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव करत आहे.

