महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – भारतीय सण-उत्सवांच्या माध्यमातून मुलांना आपली प्राचीन परंपरा समाजावी यासाठी गीता परिवार संचलित संस्कार बालभवनमध्ये वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. गुरुवारी जन्माष्टमी निमित्ताने बालभवनमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्रीकृष्ण, राधा, सुदामा, गोप व गोपिकांच्या आकर्षक पेहरावात आलेल्या जवळपास पन्नास मुलांनी या उत्सवात सहभाग घेतला. ‘हाथी घोडा पालखी, जय कन्हैय्या लाल की’ असा घोष करीत मुलांनी एकत्रितपणे हंडी फोडून गोपाळकाल्याचा आनंद लुटला.
बालभवन गोकुळासमान: श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून गुरुवारी (ता. 7) गीता परिवाराच्यावतीने संस्कार बालभवनमध्ये बालगोपाळांची ‘दहीहंडी’ बांधण्यात आली होती. यावेळी सजवलेल्या पाळण्यात विराजमान गोपाळकृष्णांच्या समोर बसून मुलांनी सामुहिकपणे वेगवेगळी भजने गावून या उत्सवाची रंगत वाढवली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वच्या सर्व पन्नासहून अधिक मुलांनी वेगवेगळ्या पौराणिक वेशभूषा केल्याने बालभवनचा परिसर गोकूळासमान भासत होता.
गोपाळकाला: लहान मुलांनी गायलेल्या विविध भजन आणि संकीर्तनाने परिसरातील वातावरण भारले होते. तासाभराच्या कार्यक्रमानंतर पाळण्यात विराजमान बाळकृष्णांची मुलांच्या हस्ते आरती करण्यात आली व नंतर सर्व मुलांना गोपाळकाला वाटप करण्यात आला.
समाधान: या कार्यक्रमाला अनेक मुलांचे पालकही उपस्थित होते, त्यांनी या सोहळ्याचे विशेष कौतुक करतांना अशा कार्यक्रमातून मुलांना आपल्या पंरपरेशी जोडून ठेवले जात असल्याबाबत समाधानही व्यक्त केले. रुपाली रायकर, ज्योती भालेराव, ईश्वरी सोनवणे यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

