सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो. मोठ्या आवाजामुळे कान कायमस्वरूपी बहिरे होण्याचा आणि लेझर किरणांमुळे डोळ्यांना गंभीर दुखापत होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ हे ध्यानात ठेवून प्रत्येकाने अशा धोक्यांपासून दूर राहिले पाहिजे, असे आवाहन कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. अमृता सागर जोर्वेकर यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत नमो सेवा संकल्प उपक्रमातून शिंदेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोफत कान, नाक आणि घसा तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरादरम्यान डॉ. जोर्वेकर यांनी ३५ विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली.
विशेष म्हणजे, या तपासणीत पाच विद्यार्थ्यांच्या कानात खडे आणि पेन्सिलचे तुकडे अडकल्याचे समोर आले. या गंभीर बाबीची दखल घेत डॉ. जोर्वेकर यांनी या सर्व बाधित विद्यार्थ्यांना स्वतःच्या दवाखान्यात नेऊन त्यांच्या कानातील वस्तू मोफत काढून देण्याची विशेष व्यवस्था केली.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना कानात पेन्सिल, काडी किंवा कोणतीही बाहेरील वस्तू घालू नये, असा महत्त्वपूर्ण सल्ला डॉ. जोर्वेकर यांनी दिला. कानात वेदना होत असल्यास, कमी ऐकू येत असल्यास अथवा कानात काही अडकल्यास स्वतः प्रयत्न न करता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
हा उपक्रम विस्तार अधिकारी अनिल गायकवाड आणि केंद्रप्रमुख नितीन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्याध्यापिका वृषाली सुनील कडलग तसेच उपाध्यापिका कल्पना पाटील यांच्या पुढाकाराने यशस्वीरीत्या राबवण्यात आला.
या अभियानांतर्गत शाळेत चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, ग्रामस्वच्छता, प्रथमोपचारविषयक मार्गदर्शन, वृक्षारोपण आणि जलसंधारण यांसारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच ‘नमो सेवा गाथा’ उपक्रमात विद्यार्थ्यांनी ‘पाण्याची बचत’ विषयावर सादर केलेल्या बालनाटिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगंबर दातीर, शीतल आंबरे, माया आंबरे, अक्षदा आंबरे व गुंजन इंगळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.