महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलने सुरू आहेत. जरांगे पाटील स्वतः आमरण उपोषणाला बसले असून त्यांना पाठिंबा म्हणून राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी साखळी उपोषणे सुरू आहेत.
मराठा आरक्षणाचा विषय मनोज जरांगे यांचे उपोषण व त्यांना मिळालेल्या राज्यभरातील पाठिंबा नंतर चांगलेच ऐरणीवर आले आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षण जाहीर करण्यासाठी चाळीस दिवसांचा वेळ देऊन देखील सरकार आरक्षण जाहीर करू शकले नाही. राज्य सरकार खोटेनाटे कारणे पुढे करत मराठा समाजाला झुलवत आहे. यामुळे संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी थेट राज्य सरकारचे प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढल्याचा प्रकार संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथे घडला आहे.
संगमनेर तालुक्यातील साकूर पठारभाग सकल मराठा समाजाच्यावतीने रविवारी (दि. २९) साकुर जवळील बिरेवाडी येथे हनुमान मंदिरापासून राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढुन राज्य सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला. प्रतिकात्मक काढलेली अंत्ययात्रा गावठाणातील स्मशानभूमीत नेत रुढीपरंपरेनुसार अंत्यविधी देखील करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली असल्याची माहिती समोर येते.
तसेच यावेळी बिरेवाडी ग्रामस्थांनी मोठा निर्णय घेत जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावात नो एंट्री असणार आहे. तसेच गावातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
असे असतानाच दुसरीकडे अकोले तालुक्यात या आंदोलनास पाठिंबा म्हणून महाराष्ट्रातील सर्वोच्च उंचीचे शिखर असलेल्या कळसुबाईच्या शिखरावर एका दिव्यांग व्यक्तीने उपोषण सुरू केले आहे. याची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.
शिवाजी गाडे (पैठण) असे या उपोषणकर्त्याचे नाव असून २७ ते २९ ऑक्टोंबर दरम्यान तीन दिवसांचे उपोषण ते करणार आहे. त्यांनी उपोषणाची कोणतीही पूर्वकल्पना न देता उपोषण सुरू केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कळसुबाई शिखरावर वेळोवेळी मदत पोहोचविणे शक्य नसल्याने गाडे यांना उपोषण आणि आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणांकडून सुरू आहे.



